Sai Baba Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर शिर्डी साईबाब चरणी कोट्यवधीचे दान, सोने-चांदी, परकीय चलनासोबतच मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन डोनेशन
Shirdi, Sai Baba | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा मंदिरात (Sai Baba Temple) गुरुपपौर्णिमा (Guru Purnima) मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या गुरुपौर्णिमेला भक्तांनी साईंच्या चरणी भरभरुन दान अर्पण केले. भक्तांनी केलेल्या दानाचा आकडा थोडाथोडका नसून तो तब्बल कोट्यवधी रुपायंच्या घरात आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये साईंच्या चरणी तब्बल 5 कोटी 12 लाख रुपयांचे दान प्राप्त झाले. गुरुपौर्णिमेला प्राप्त झालेल्या दानाची रक्कम मोजण्यात आली. त्यात हा आकडा पुढे आला.

साई भक्तांकडून मिळालेल्या दानाचे वर्गीकरण पुढीप्रमाणे: दानपेटी - 2 कोटी 17 लाख, देणगी काऊंटर - 1 कोटी 59 लाख, ऑनलाईन डोनेशन - 1 कोटी 36 लाख, परकीय चलन - 19 लाख ( 12 देशांचे) , सोने-  479 ग्रॅम (22 लाख 14 हजारांचे) , चांदी-  6 किलो 800 ग्रॅम (3 लाख 22 हजार रुपये किमतीची)  . (हेही वाचा, Sathya Sai Baba 94th Birth Anniversary: सत्य साई बाबा यांच्या 94 व्या जयंती निमित्त रंगणार सोहळा; जाणून घ्या त्यांना का म्हणतात शिर्डीच्या साईंचा अवतार?)

पाठीमागील दोन वर्षे मोठ्या प्रमाणावर कोरोना महामारी होती. त्यामुळे लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे केवळ शिर्डीच नव्हे तर राज्य आणि देशभरातील मंदिरे मोठ्या प्रमाणावर बंद होती. कोरोना महामारीचा कहर कमी झाल्यानंतर प्रथमच मुक्त वातावरणात आता विविध सण, उत्सव साजरे होत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिरातही मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. शिर्डीतील साई मंदिरात 12 ते 14 या काळात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. दहीहंडी फोडून शेवटच्या दिवशी या उत्साहाची सांगता करण्यात आली.

दरम्यान, गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत राज्यभरातून शेकडो पालख्या साई मंदिरात दाखल झाल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला राज्य आणि देशभरातून साईभक्त शिर्डिला साईदर्शनासाठी दाखल झाले होते. शीर्डी साईबाबांवर देश आणि जगभरातील अनेक भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे भाविक विविध सण उत्सवाचे औचित्य साधत शिर्डीमध्ये साईदर्शनासाठी हजेरी लावतात.