
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे एक चर्चित आणि वादग्रस्त व्यक्तीमत्व. आपल्या विविध वक्तव्यांमुळे त्यांनी महाराष्ट्रात वादाचा धुरळा उडवून दिला. कधी महापुरुषांबद्दल अथवा महान व्यक्तिमत्वांबद्दल केलेली वादग्रस्त विधने (Governor Bhagat Singh Koshyari & 5 Controversies) तर कधी त्यांच्या संवैधानिक पदावर राहूनही केलेले राजकीय वर्तन. यांमुळे ते नेहमीच वादाचे आणि टीकेचे कारण ठरले. आता त्यांनी राज्यपाल पदावरुन पायऊतार आणि “सर्व राजकीय जबाबदारीतून मुक्त” होण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे. राष्ट्रपती त्यांची इच्छा पूर्ण करणार का? याबाबत उत्सुकता आहेच. परंतू, त्यांच्या इच्छेनंतर पुन्हा एकदा त्यांच्यावादग्रस्त विधानांची चर्चा नव्याने सुरु झाली आहे.
नोव्हेंबर 2022- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये एका भाषणात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत. आजच्या काळातील आदर्श तुम्हाला तुमच्या आजुबाजूलाच पाहायला मिळतील असे ते म्हमाले होते. ''पूर्वी, जेव्हा तुम्हाला विचारले जायचे की तुमचा आयकॉन कोण, तेव्हा जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी हे उत्तर असायचे. महाराष्ट्रात, तुम्हाला इतरत्र पाहण्याची गरज नाही (कारण) इथे खूप आयकॉन आहेत. नितीन गडकरी, डॉ. आंबेडकर हे आजच्या काळातील तर छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श आहेत, असे राज्यपालांनी म्हटले होते. यावरुन जोरदार वाद निर्माण झाला होता.
जुलै 2022- गुजराती आणि राजस्थानी बाहेर गेले तर महाराष्ट्र कंगाल होईल

महाराष्ट्राच्या अस्मतेवर हल्ला करणारे प्रचंड वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जुलै 2022 मध्ये केले होते. महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई आणि ठाणे येथून गुजराथी आणि राजस्थानी समाज निघून गेला तर महाराष्ट्राकडे पैसेच उरणार नाहीत, असे कोश्यारी यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Year Ender 2018 : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले देशभरातील टॉप 10 राजकीय नेते)
मार्च 2022- महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द

राज्यपाल पदावर असतानाही भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे वक्तव्य त्यांनी मार्च 2022 मध्ये केले होते. सावित्रीबाईंचे वयाच्या 10 व्या वर्षी लग्न झाले होते आणि त्या वेळी त्यांचे पती 13 वर्षांचे होते. आता विचार करा, लग्न झाल्यावर मुली आणि मुलांनी काय विचार केला असेल? त्या वेळी त्यांचे जीवन कसे असेल? असा प्रश्न विचारत त्यांनी थट्टा केली होती.
विधान परिषदेतील 12 रिक्त जागांचा वाद

राज्यपालांच्या कोट्यातून राज्य विधान परिषदेतील 12 रिक्त जागा भरण्यावरुनही मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. हा वाद अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने राज्यपाल कोट्यातील विधानपरिषद सदस्यांसाठी सुचवलेली यादी राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप स्वीकारली नाही. यावरुनही तीव्र वाद निर्माण झाला होता. राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्षही पाहायला मिळाला.
नोव्हेंबर 2019- पहाटेचा शपथविधी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पहाटे उटून भल्या सकाळी दवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिलेल्या अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. हा शपथविधी औटघटकेचा ठरल्यामुळे राज्यपालांचे हसे तर झालेच होते. परंतू, ते सरकारही औटघटकेचे (48 तासांचे) ठरले होते.