Google Pay, Phone Pay द्वारा आता काढता येणार ST BUS मध्येही तिकीट; सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून होणार सुटका
ST Bus | (Photo Credits: MSRTC)

एसटी प्रवासादरम्यान (MSRTC) आता सुट्ट्या पैशावरून होणारी कटकट दूर करण्यासाठी प्रशासनाने नवा पर्याय दिला आहे. एसटी प्रवासामध्येही आता कंडक्टर सोबत गूगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) द्वारा तिकीटाचे पैसे देता येणार आहेत. त्यासाठी खास मशिन आता एसटी कंडक्टर कडे दिले जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मोदी सरकारचा डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्याचा मनसुबा आहे. आणि आता हे प्रयत्न शहरी सोबतच ग्रामीण भागातही जाताना दिसत आहेत. मटा च्या वृत्तानुसार, यासाठी एसटी विभागाने एक हजार पेक्षा जास्त मशिनच्या ऑर्डर दिल्या आहेत.

एका नवीन कंपनीच्या माध्यमातून एसटी कंडक्टर कडे अँड्रॉइड तिकिट मशिन देण्यात आली आहेत. मध्यवर्ती बसस्थानकात एकूण 200 मशिन पाठविण्यात आली आहेत. येत्या आठवडाभरामध्ये मशिन कंडक्टरांना दिली जातील. या नवीन मशिनच्या माध्यमातून आता एसटी कर्मचाऱ्यांना बॅटरीचाही त्रास कमी होणार आहे. याशिवाय आगामी काही दिवसांत या मशिनवर ऑनलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.

नवी मशीन मोबाईल फोन प्रमाणे आहे त्यामुळे त्याचा वापर करणं सोप्प आहे. एसटी कर्मचाऱ्याकडे चिल्लर जास्त आढळल्यास, त्यांच्यावर कारवाई केल्याचं दिसलं आहे. त्यामुळे आता ही मशिन या अनेक कटकटी आणि वादावादीच्या कटू प्रसंगातून सुटका होईल.

मुंबई मध्ये सध्या बेस्ट बस मध्येही चलो अ‍ॅप किंवा कार्ड द्वारा तिकीट काढण्याची मुभा प्रवाशांना देण्यात आली आहे. यामुळे सुट्ट्या पैशांच्या कटकटीमधून त्यांची सुटका झाली आहे. आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे त्यामध्ये अनेकदा चाकरमनी एसटी ने गावी जाणार आहेत. अशावेळी तिकीटासाठी सुट्ट्या पैशांऐवजी डिजिटल पेमेंटचा नवा पर्याय त्यांच्याकडे असेल अशी आशा आहे.