मुंबई लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच उकाडा, घाम यांच्यासह प्रवास करणाऱ्या लोकांना आता एसीच्या प्रवासाचा आनंद घेता येईल. भारतीय रेल्वे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये चालणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना वातानुकूलित ट्रेनमध्ये (AC Train) रूपांतरित करण्याचे नियोजन आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डाने या संदर्भात निर्णय घेतला आहे.
बऱ्याच काळापासून याबाबत विचार चालू होता. आता हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. मुंबई लोकल त्याच्या वेग आणि सेवेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईत काम करणारे बहुतेक लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथील लोकसंख्याही खूप जास्त आहे. अशात मुंबईकरांच्या रोजच्या जीवनात मुंबई लोकल मोठी भूमिका बजावत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी विशेष तयारी केली जात आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'च्या एका अहवालानुसार, लोकल ट्रेनचे भाडेही कमी होण्याची शक्यता आहे आणि ती महानगरांच्या भाडे रचनेवर आधारित असेल. भारतीय रेल्वेने सेमी एसी लोकल चालवण्याची योजना बंद केली आहे. आता फक्त एसी गाड्या पूर्णपणे चालवण्याची तयारी आहे. सर्व लोकल गाड्यांना एसी गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याची तयारी सुरू आहे.
MRVC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) रवी अग्रवाल यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, 'आम्ही मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट्स (MUTP) अंतर्गत सर्व एसी लोकल ट्रेन खरेदी करू.' अहवालांनुसार, एमआरव्हीसी येत्या काळात 283 नवीन एसी लोकल गाड्या खरेदी करेल. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एसी लोकल ट्रेनच्या खरेदीला मान्यता दिली आहे. मात्र, रेल्वेने अद्याप यासाठी वेळ मर्यादा निश्चित केलेली नाही. (हेही वाचा: Mumbai Local Update: 18 वर्षांखालील सर्व विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा)
रेल्वेने सांगितले की, उपनगरी एसी लोकल गाड्यांचे भाडे रचना मुंबई मेट्रो एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) किंवा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या मेट्रो भाड्यावर आधारित असेल. यासंदर्भात, एमआरव्हीसीने मुंबई आणि दिल्लीतील मेट्रो भाड्याच्या बरोबरीने एसी लोकल गाड्यांचे भाडे ठेवण्याची सूचना केली होती.