शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकल ट्रेन्स सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी राज्य सरकारने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना लोकल ट्रेन्स प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. यासोबतच कोविड-19 चे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि वैद्यकीय कारणामुळे लस घेऊ न शकणाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
लोकल ट्रेनसोबतच या सर्व नागरिकांना मॉल्स काही राज्यातील मंदिरे, रेस्टॉरन्ट, लग्नसमारंभ आणि मल्टिफ्लेक्समध्ये जाण्यास परवानगी आहे. ज्युनियर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना लेक्चर अडेंट करण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पुढच्या आठवड्यापासून काही कॉलेजेसमध्ये लेक्चर्स आणि प्रॉटीकल्सला सुरुवात होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देणे गरजेचे होते. (मध्य रेल्वेचे राज्य सरकारला पत्र, विद्यार्थ्यांना लोकलचे तिकिट देण्याबद्दल SOP जाहीर करण्याची मागणी)
18 वर्षांखालील मुलांसाठी अजूनपर्यंत लसीला मान्यता मिळाली नसल्यामुळे त्यांचे लसीकरण करणे शक्य नाही. लस घेण्याची इच्छा असूनही काही वैद्यकीय कारणांमुळे लस घेऊ न शकणारे अनेकजण देशात आहेत. अशा सर्व नागरिकांना काही सेवांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे स्टेट नोटीफिकेशनमध्ये म्हटले होते.
प्रवासादरम्यान सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. 18 वर्षांखालील मुलांसाठी बाजारात लस आल्यावर त्यांना ती घेणे गरजेचे असेल. दरम्यान, लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर पुढील 60 दिवस 18 विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी असेल.