
गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2025) सणानिमित्त, महाराष्ट्रात सोने (Gold) खरेदीची परंपरा आहे. मात्र, सध्याच्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Rate) विक्रमी वाढ झाल्यामुळे, या परंपरेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये सध्या मोठी वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही चिंतेत आहेत. मार्च 2025 मध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढल्याने, भारतातील स्थानिक बाजारपेठेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. या हंगामात सोने आणि चांदीच्या किमती मागील हंगामापेक्षा जास्त वाढल्या आहेत. सोने पहिल्यांदाच 90 हजारांच्या जवळ आहे, याशिवाय चांदीही अनेक दिवसांपासून एक लाख रुपयांच्या वर आहे.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, जागतिक स्तरावर या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतीत 1,100 रुपयांची वाढ झाली आणि ती 92.150 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमावर पोहोचली. शनिवारी, 29 मार्च रोजी, भारतातील शुद्ध सोन्याचा किंवा 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 220 रुपयांनी वाढून 91,200 रुपये झाला. भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर आता 83,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, जो प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे, भारतातील 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 160 रुपयांनी वाढून 68,400 रुपये झाला आहे.
जागतिक व्यापार युद्ध वाढण्याची आणि त्याचा आर्थिक वाढीवर परिणाम होण्याची भीती असल्याने सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. सोन्याच्या किमतीत झालेल्या तेजीनंतर आज भारतात चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. भारतात 1 किलो चांदीची किंमत 1 हजार रुपयांनी कमी झाल्यानंतर, ती आता 1,04,000 वर पोहोचली आहे. भारतात 100 ग्रॅम चांदीचा किरकोळ दर 10,400 रुपये आहे. गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो, ज्यामुळे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, वाढलेल्या सोन्याच्या किंमतींमुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. (हेही वाचा: Gudi Padwa 2025 Shubh Muhurat: गुढी पाडव्याच्या 'या' शुभ मुहूर्तावर उभारा आनंदाची गुढी; शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून)
दरम्यान, अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणांमुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये झालेली विक्रमी वाढ जागतिक आर्थिक अस्थिरतेचे प्रतीक आहे. सोन्याच्या किंमती विक्रमी स्तरावर असल्याने, नवीन गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमतींवर गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. विशेषज्ञांच्या मते, सध्याच्या उच्च किंमतींमुळे अल्पकालीन नफा मिळवणे कठीण होऊ शकते, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अद्याप सुरक्षित पर्याय मानला जातो.