Representational Image | (Photo Credits: PTI)

सांगली (Sangali) येथे काही दिवसांपूर्वी ब्रम्हनाळ मध्ये पुरग्रस्तांच्या मदतीला गेलेली बोट उलटून अनेकजण बुडाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आता पुराचे पाणी ओसरु लागल्याने या पाण्यात जवळजवळ 25 तोळ्यांचे सोने सापडले आहे.

ब्रम्हनाळ येथे बचावासाठी गेलेल्या पुरग्रस्तांना वाचवण्यासाठी गेलेली बोट बुडाली. तर गुरुवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पाण्यात 25 तोळे सोने आणि रोख रक्कम मिळाली आहे. यामध्ये सोने, पैसे, मोबाईल आणि चांदिचे दागिने सापडले आहेत. पुरामध्ये मृत झालेल्या महिलांचे हे दागिने असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.(पुरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाखांची मदत जाहीर, नुकसान झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार)

काय आहे  प्रकरण?

कोल्हापूर, सांगली मध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली होती. यामध्ये पूरग्रस्तांना मदतीचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. दरम्यान स्थानिक बोटीतून प्रवास करताना एक बोट उलटल्याची दुर्दैवी घटना सांगली येथील ब्रम्हनाळ गावात घडली. या पावसामुळे साचलेल्या पाण्याची उंची वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी 25-30 जणांना घेऊन जाणारी एक बोट उलटली गेली. यामध्ये लाईफ जॅकेट नसल्याने काही जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले.