पुरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाखांची मदत जाहीर, नुकसान झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार
Flood (Photo Credit : IANS)

कोल्हापूर-सांगली येथे पडलेल्या मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत होत सर्व प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुरस्थितीतून नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करण्यात आले. आता पुराचे पाणी जरी ओसरत चालले असले तरीही झालेली नुकसान भरपाई कशी करायची हा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे. परंतु पुरग्रस्तांसाठी राजकीय नेत्यांपासून ते कलाकारापर्यंत सर्वजण सर्वोतोपरी त्यांना मदतीचा हात देऊ करत आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबई विद्यापीठाने पुरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेली मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच पुरग्रस्त भागातील शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नुकसान झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचसोबत पुरग्रस्त ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत तेथील कोणत्या शैक्षणिक साहित्यांची गरज आहे हे पाहण्यासाठी एक टीम नेमण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षामध्ये शैक्षणिक साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(पूरग्रस्तांची पूर्णतः नष्ट झाली घरे बांधून देण्याची सरकारची खास मदत; छोट्या व्यावसायिकांनाही मिळणार नुकासंभारापाई- मुख्यमंत्री)

पुरग्रस्तांना सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून राज्याच्या विविध भागातून कोल्हापूर-सांगली मधील नागरिकांना दैनंदिन जीवनाच्या आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सरकारकडे पुरग्रस्तांसाठी 600 कोटीची मागणी करणार असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे. त्याचसोत काही संस्था आणि नेत्यांनी पुराचा फटका बसलेल्या गावांना दत्तक घेतल्याचे सांगण्यात येत आहे.