Mughal coins (PC -Wikimedia Commons)

Wardha: वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथील शेतात एका लोखंडी डबीत मुगलकालीन नाणे, सोन्याचे बिस्कीट आणि सोन्याच्या इतर वस्तू सापडल्या आहेत. या सर्व सोन्याच्या वस्तूंची किंमत 20 लाख 54 हजार रुपये आहे. हे सोनं या ठिकाणी कसं मिळालं याचा तपास पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येणार आहे. यासाठी हे सोनं पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाचणगाव येथील सतीश उल्हास चांदोरे यांच्या शेतात लोखंडी डबीत सोनं सापडलं. त्यानंतर यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मजुरांना पडीक घराच्या मातीत ही डबी सापडली. या डबीत 20 लाख 54 हजार किंमतीचे मुगलकालीन नाण्यासह सोन्याचे बिस्कीट सापडले. (वाचा - परभणी: 1 जानेवारीला जन्मलेल्या चिमुकलीला जिलेबी दुकानदाराने दिले सोन्याचे नाणे; पिता-पुत्रांचा मागील 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरु)

यातील सोन्याच्या बिस्किटावर नॅशनल बॅक ऑफ इंडिया असे लिहिले आहे. याशिवाय या डबीत एक मोगलकालीन नाणे, एक सोन्याचा तुकडा, दोन गोल सोन्याचे वेळे, कानातील चार सोन्याच्या रिंग आदी वस्तू आढळल्या आहेत. या सोन्याच्या वस्तूंचे एकून वजन 428 ग्रॅम आहे.

दरम्यान, ही सोन्याची डबी या पडक्या घरात कशी आली याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच अधिक तपास करण्यासाठी हे सोनं पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.