
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन(Lockdown) लागू झाल्यानंतर गेले सुमारे चार महिने राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे तेथे पूजाअर्चा करणाऱ्या गुरव समाजाचे (Gurav Community) उत्पन्न बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी, मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांनी गुरव समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीस वेब संवादाद्वारे संबोधित केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे गुरव समाजासाठी मागण्या केल्या. या बैठकीस राष्ट्रीय गुरव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव उपस्थित होते. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्गच्या पडझडीच्या पोस्टची दखल; पुरातत्त्व खात्याला दिले निर्देश)
त्याचवेळी, मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 18, 2020
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंदिरांमध्ये पूजा करणाऱ्या व मंदिरांची देखभाल करणाऱ्या गुरव समाजाला गेले 4 महिने सोसलेला आर्थिक ताण आणि आगामी 2 महिन्यांची तरतूद अशी 6 महिन्यांसाठी रोख आर्थिक मदत करावी. मंदिरांची साफसफाई, देखरेख, सुरक्षा व पूजाअर्चा याचा खर्च लॉकडाऊनमध्येही चालूच आहे. त्याचा भार गुरव समाजावरचं पडत आहे. राज्य सरकारने मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे. लॉकडाऊनच्या काळातील मंदिरांचे वीजबिल प्रचंड मोठे आले आहे. मंदिरांच्या वतीने राज्य सरकारने वीजबिल महावितरणकडे भरावे, असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
आगामी काळात जेव्हा शाळा सुरू होतील, तेव्हा राज्य सरकारने गुरव समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी फीसह थेट आर्थिक मदत करावी. तसेच गुरव समाजाला सध्याच्या संकटात तातडीच्या कर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशीदेखील मागणी पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.