Mandhardevi Kalubai Temple | (File Image)

महाराष्ट्रासह अनेक ठिकाणच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवीच्या (Mandhardevi) श्रीकाळूबाईची (Kalubai) यात्रा 12 ते 29 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या कालावधीत पशुबळी आणि वाद्य वाजविण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. परिसरात निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 लागू केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करत, यात्रेदरम्यान पशुबळी देण्यास परवानगी दिली जाणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस व प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.

यासह ढोल-ताशा व वाद्यांच्या आवाजामुळे सामान्यत: अडथळा निर्माण होत नसला तरी, मुख्य दरवाजा ते मंदिर यांच्या दरम्यान आणि मांढरदेवीच्या आसपासच्या परिसरात वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. वाद्यांच्या गोंगाटामुळे सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण होऊ शकतात. यात्रेदरम्यान वाहनांची हालचाल आणि वैयक्तिक वर्तन याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करून, परिसरातील सुरक्षितता, आरोग्य आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

ध्वनिप्रदूषणाबाबतही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाणार आहे. जिल्हा पोलीस दलाला निर्बंधांचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक-भक्त वर्षभर येत असतात. (हेही वाचा: Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी)

मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. दरम्यान, याआधी 2005 मध्ये मांढरदेवीच्या यात्रेवेळी मोठी दुर्घटना घडली होती.  यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 340 लोकांनी आपले प्राण गमावले होते.