मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्गच्या पडझडीच्या पोस्टची दखल; पुरातत्त्व खात्याला दिले निर्देश
CM Uddhav Thackeray, Vijaydurg Fort (PC - Facebook, Instagram)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याच्या (Vijaydurg Fort) पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर (Instagram) टिपले आणि केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. त्यांनी चित्रित केलेल्या छायाचित्रांचा ‘महाराष्ट्र देशा’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. या प्रेमातून ते दुर्गप्रेमी संघटनेचेदेखील प्रणेते ठरले आहेत. छायाचित्रकार असल्यामुळे इन्स्टाग्राम या छायाचित्रांशी निगडीत समाज माध्यमावरील त्यातही गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते सजग असतात. यातून मुख्यमंत्र्यांनी आज इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाचा एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. (हेही वाचा - शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन)

उद्धव ठाकरे यांनी या पोस्टची तत्काळ दखल घेतली आणि भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविली. तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या.