
सध्या सोशल मीडियावर एक नवीन लाट उसळली आहे, ती म्हणजे ‘एआय घिबली आर्ट’ (AI Ghibli Art). ही कला जपानच्या प्रसिद्ध स्टूडियो घिबलीच्या हाताने रेखाटलेल्या चित्रशैलीवर आधारित आहे. या फीचरमुळे लोक आपल्या फोटोंना घिबलीच्या दृश्यात बदलत आहेत. हा ट्रेंड इतका वाढला की, सेलिब्रिटींपासून ते नेत्यांपर्यंत आणि ब्रँड्सपर्यंत सर्वांनी यात भाग घेतला. मात्र सोशल मीडियावर या 'एआय घिबली आर्ट' ट्रेंडबाबत, मुंबईचा राजा मंडळाने (Mumbai Cha Raja Mandal) नागरिकांना भगवान गणेश आणि इतर देवांच्या प्रतिमा असलेल्या पोस्ट काढून टाकण्याची विनंती केली आहे. ही विनंती मंडळाने बुधवारी शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये करण्यात आली. मंडळाने म्हटले आहे की, असे फोटो हे भगवान गणेशाचा अपमान आहेत.
याबाबत केलेल्या पोस्टमध्ये मंडळाने म्हटले आहे, ‘मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन! आपणा सर्वांना ज्ञात आहे की, मुंबईचा राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते. सध्या, सोशल मीडियावर काही लोक बाप्पांच्या छायाचित्रांचे 'घिबली आर्ट' (Ghibli Art ) तयार करत आहेत, जे योग्य वाटत नाही. (हेही वाचा: Siddhivinayak FD Scheme for Girls: सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मुलींसाठी एफडी योजना; विक्रमी 133 कोटी रुपये कमाईची नोंद)
आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया बाप्पांच्या छायाचित्रांचे 'घिबली आर्ट' तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केले असेल त्यांनी ते सोशल मीडियावरून काढून टाकावे. अशा प्रकारच्या एआय अॅपमध्ये व्यंग्यात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नकळतपणे आपण आपल्याच देवाचा अपमान करतो. बाप्पाच्या मूर्तीचे असे रूपांतर करणे योग्य नाही. त्याऐवजी, आम्ही आपणा सर्वांना आवाहन करतो की, आपण आपल्या कलागुणांचा वापर करून एआयचा ॲपचा वापर न करता आपल्या हातांनी किंवा डिजिटल सॉफ्टवेअरच्या मदतीने बाप्पाची सुंदर चित्रे साकारून आपल्या कलेतून बाप्पावरील आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. गणपती बाप्पा मोरया!’
दरम्यान, या ट्रेंडने डिजिटल जगात क्रांती आणली असली, तरी त्यावर टीकाही होत आहे. काही कलाकारांचे म्हणणे आहे की, घिबलीची शैली ही दशकांच्या मेहनतीचे फळ आहे, आणि एआयने ती काही सेकंदांत कॉपी करणे हे कलेचा अवमान आहे. यामुळे आपण आपल्या पारंपरिक कलेचा विसर पडतोय का, असाही प्रश्न उपस्थित होतो. हा एआय घिबली आर्ट ट्रेंड एका नव्या युगाची सुरुवात आहे. तो लोकांना आनंद देतो, मात्र त्याचवेळी कला आणि तंत्रज्ञान यांच्यातील सीमारेषेवर प्रश्नचिन्हही उभे करतो.