पुणे शहरातील बावधान परिसरात आज (22 डिसेंबर 2020) पुन्हा एकदा गवा (Gaur Found in Pune) दिसला. पुणे-बंगरुळ महामार्गावर(Pune-Bangalore Highway) गव्याचे दर्शन (Gaur Found Bavdhan) झाले. डोंगर आणि जंगल परिसर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरे किंवा नागरिकांची वर्दळ नाही. परंतू, रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांच्या दृष्टीस हा गवा पडल्यानंतर त्याबाबत वन विभागाला (Forest Department) कल्पना देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, वनविभाग, पुणे पोलीस आणि अग्निशमन दल गवा असलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
दरम्यान, या आधी काही दिवसांपूर्वीच (9 डिसेंबर 2020) पुणे येथील कोथरूड परिसरात गवा दिसला होता. परंतू, नागरिक आणि बघ्यांनी एकाच वेळी मोठी गर्दी केल्याने गवा बिथरला आणि तो सैरावैरा धावू लागला. बिथरलेला गवा नागरी वस्तीतील अनेक सोसायट्यांमध्ये शिरला त्यामुळे सोसायट्यांच्या काही फाटकांचे नुकसान झाले. दरम्यान, गव्याला पकडताना नागरिक आणि बघ्यांची मोठी गर्दी प्रमुख अडथळा ठरत होती. पकडापकडीचा हा खेळ साधारण एक ते दीड तास चालला. या सर्व गोंधळात गवा मोठ्या प्रमाणावर जखमी झाला. पुढे त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असल्यामुळे बावधान येथे दिसलेल्या गव्याबाबतती कोणताही अनपेक्षीत आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभाग सतर्क आहे. (हेही वाचा,'Please Forgive Us- We are Guilty': 'आम्हाला माफ कर' गव्याची प्रतिकृती साकारुन पुणेकरांचा माफीनामा )
घटनास्थळी वन विभाग, पोलीस आणि अग्निशमन दल जवान दाखल झाले आहेत. या आधी गवा पकडताना झालेल्या चुका टाळून अधिक बिनचूकपणे गवा पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. दुसऱ्या बाजूला नागरिक आणि बघ्यांची गर्दी जमून नये. गर्दी जमलीच तर ती नियंत्रणात राहावी. त्याचा गवा पकडताना कोणताही अडथळा ठरु नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. या सर्व प्रयत्नांना किती यश येते हे प्रत्यक्ष गवा पकडल्यानंतर आणि त्याला जंगलात सुखरुप सोडल्यानंतरच कळणार आहे.