पुण्यातील खराडी येथे गॅस गळती होऊन स्फोट; 6 महिन्यांच्या मुलीसह आई-वडील गंभीर जखमी
blast | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

पुण्यातील (Pune) खराडी (Kharadi) येथे आज सकाळी गॅस गळती (Gas Leakage) होऊन स्फोट (Blast) झाला. या स्फोटामध्ये 6 महिन्यांच्या चिमुरडीसह आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 7.45 वाजताच्या सुमारास खराडीमधील संभाजीनगर येथे ही घटना घडली. शंकर भवाळे (वय 28), आशाताई शंकर भवाळे (वय 22) आणि स्वराली भवाळे (6 महिने), अशी जखमी झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. सध्या या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिले आहे.

खराडीमधील संभाजीनगर येथे शंकर भवाळे हे आपल्या पत्नी आणि 6 महिन्याच्या लहान मुलीसह घरात झोपले होते. दरम्यान गॅस गळती होऊन गॅस संपूर्ण घरात पसरला. भवाळे यांच्या पत्नी आशा यांनी सकाळी पाणी तापवण्यासाठी लाईटने गॅस पेटवला आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील इतर वस्तूंनी पेट घेतला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यामुळे चारही खोल्यांवरील पत्रे उडाले. (हेही वाचा - औरंगाबाद: मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडे यांचे आज लाक्षणिक उपोषण)

या स्फोटामुळे स्वयंपाक घरातील ओट्याचे सिंमेट पडले. तसेच घरातील सर्व कपडे आणि इतर साहित्य जळून गेले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातचं अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं.