 
                                                                 मराठवाड्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज लाक्षणिक उपोषण (Hunger Strike) करणार आहेत. मराठवाड्याचे हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन व मराठवाड्याच्या प्रत्येक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, असे या उपोषणाचे प्रमुख मुद्दे आहेत. या उपोषणासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते हरिभाऊ नाना बागडे, रावसाहेब दानवे, मराठवाड्यातील नेते आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात मुंबईमध्ये भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, आज भाजप पक्षाच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. (हेही वाचा - आदित्य ठाकरे यांचा 'मुंबई नाईट लाईफ' हा उपक्रम ठरला हिट की फेल? जाणून घ्या)
मराठवाड्यात पाण्याची वण वण संपवून समृद्धी ची सत्ता स्थापना व्हावी यासाठी माझं उपोषण एक लक्षवेधी प्रयास आहे!! उपोषण आक्षेपासाठी नाही ही अपेक्षांसाठी आहे ..मागचे 5 वर्ष प्रयत्न झाले पुढे ही व्हावे आणि होतील ही रास्त अपेक्षा आहे ..आपण ही साथ दयावी 🙏🏻🙏🏻
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 26, 2020
मराठवाड्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे कोणतेही उत्पन्न नाही. त्यामुळे येथील शेतकरी नेहमी चिंतेत असतो. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यामुळे तेथील लोक शहरांमध्ये स्थलांतर करत आहेत. भाजप सरकारने मागील 5 वर्षांत मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारनेही मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
