Image used for representational purpose | (Photo Credits: ANI Twitter)

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांमध्ये लवकरच एका मोठ्या धरणाचा समावेश होणार आहे. 'गारगाई' (Gargai) असे धरणाचे नाव असून या धरणामुळे मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी या धरणाचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सामना ने दिलेल्या वृत्तानुसार, या धरणासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रस्तावाला 2 नोव्हेंबरला झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याने या धरण प्रकल्पाचे काम आता युद्धपातळीवर सुरु होणार आहे. या गारगाई प्रकल्पामुळे मुंबईला दररोज होणा-या 3958 दशलक्ष पाणीपुरवठ्यात प्रतिदिन 440 दशलक्ष लीटर पाण्याची भर पडणार आहे.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा अशा सात धरणांचा समावेश आहे. या धरणांमधून मुंबईला मिळणारे पाणी हे मुंबईच्या वाढत जाणा-या लोकसंख्येच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांना कमतरता भासू नये आणि तमाम मुंबईकरांची तहान भागवली जावी यासाठी मुंबईत हे गारगाई धरण बांधण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा- मुंबईत येणार प्लास्टिक चे रस्ते; पुर्नवापरासाठी BMC ने लढविली नामी शक्कल

कुठे बांधण्यात येणार हे धरण?

पालिकेचा नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. यामध्ये 69 मीटर उंचीचे, 972 मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. गारगाई धरणातील पाणी बोगद्याद्वारे मोडक सागर धरणात आणून गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरवण्यात येणार आहे.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनही करणार

गारगाई प्रकल्पामुळे एकूण 840 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे 424 हेक्टर खासगी जमीन वाटाघाटींमध्ये थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाचा अंदाजे खर्च 147.79 कोटी येईल. या प्रकल्पामुळे बाधित होणा-या 619 कुटूंबाचे पुनर्वसन पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.