बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी सज्ज; असे असेल वाहतुकीचे नियोजन
गणपती विसर्जन (Photo credits: Wikimedia Commons)

आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सर्वजणच सज्ज झाले आहेत, शहरातीत मोठ मोठ्या मंडळांच्या मूर्त्यांच्या विसर्जनासाठीच्या तयाऱ्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. 10 दिवसांनंतर होणारे गणपतीचे विसर्जन हा प्रत्येकासाठीच एक सोहळा असतो. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ मोठ्या शहरांत तर विसर्जनाचा थाट काही औरच. अशा वेळी उसळणारी गर्दी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या ही तर पोलिसांसाठी प्रत्येकवर्षीची डोकेदुखी ठरते. या विसर्जनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही विशेष काळजी घेण्यात येते. पुण्यातील बहुतेक सर्व मंडळांचे गणपती हे लक्ष्मी रोड मार्गे जात असल्याने तितकी वाहतुकीची समस्या उद्भवत नाही. मात्र राजधानी मुंबापुरीत ट्राफिक आणि अशा अनुचित प्रकारांची शक्यता जास्त असल्याने मुंबईकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यावर्षीदेखील विसर्जनादरम्यान ट्राफिकची समस्या उद्भवू नये आणि वाहनचालकांना मार्गांचे नियोजन आधीपासूनच करता यावे म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतुकीचे नियमन केले आहे. तसेच या काळात शहरात 50 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून शहरातील पाच हजार सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने विविध परिसरांची पाहणी केली जाणार आहे.

मुंबईतील विविध चौपाट्यांवर उसळणारी गर्दी पाहता घातपात घडू नये किंवा कायदा व सुव्यस्था बिघडू नये यासाठी पोलिसांच्या विशेष तुकड्यांचा बंदोबस्त चौपाट्यांवर असणार आहे. शहरात 162 हून अधिक विसर्जनाची ठिकाणी असून विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणीही अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येईल. लालबागच्या राजासाठी खास बंदोबस्त असून, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनमधून नजर ठेवण्यात येणार आहे.

विसर्जनादरम्यान होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता मुंबईतील 53 रस्ते वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवण्यात येणार असून, 56 रस्ते हे वन वे असतील. 99 ठिकाणी नोपार्किंग झोन तयार करण्यात आले असून, 18 मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. उद्या गणेश विसर्जनानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडत असतात. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहनांना आणि इतर वाहतूक चालकांना त्रास होऊ नये यासाठी तब्बल 3200 वाहतूक पोलिस तैनात असणार आहेत. त्यांच्या मदतीला सुमारे दीड हजार वॉर्डन असतील. वाहतूक पोलिसांच्या वतीने गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडा मस्जिद वांद्रे, जुहू चौपाटी, गणेश घाट पवई येथे पाच खास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

असे असणार ट्राफिकचे नियोजन

लोअर परेल ब्रिज बंद झाल्यामुळे अनेक मंडळाला एलफिस्टन आणि महालक्ष्मी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

डेलिसली पुल तोडल्यामुळे परेल, लालबाग, शिवरी, चिंचपोकळी आणि लोअर परेल परिसरातील 40 प्रमुख मंडळांना अतिरिक्त तीन किलोमीटर प्रवास करावा लागेल, आधीच गर्दी असलेल्या महालक्ष्मी आणि सात रस्ता परिसरात जर प्रवाश्यांनी एलफिन्स्टन पुलाचा मार्ग केला तर एकेरी वाहतूकीला अधिक त्रास होईल.

हे मार्ग बंद

दक्षिण मुंबई : नाथालाल पारेख मार्ग, जिनाभाई राठोड मार्ग, जगन्नाथ शंकरशेट मार्ग, व्ही. पी. रोड, बी. जे. रोड, सी. पी. टँक मार्ग, दुसरा कुंभारवाडा मार्ग, संत सेना मार्ग, दुसरी सुतार गल्ली, नानूभाई देसाई मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग, बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, साने गुरुजी मार्ग, डॉ. ई बार्जेस मार्ग, जेराबाई वाडिया मार्ग

मध्य व पूर्व उपनगर : रानडे रोड, शिवाजी पार्क रोड क्रमांक तीन आणि चार, केळुस्कर मार्ग दक्षिण आणि उत्तर, न. चि. केळकर मार्ग, एम. बी. राऊत मार्ग, टिळक ब्रिज, हेमू कलानी मार्ग, गिडवाणी मार्ग, घाटलागाव, लालबहादूर शास्त्री मार्ग, भट्टीपाडा मार्ग, जंगल मंगल मार्ग, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, सर्वोदय नगर

पश्चिम उपनगर : लिंक रोड, टागोर रोड, जुहू रोड, जुहू तारा रोड, शामराव परुळेकर मार्ग, जनार्दन म्हात्रे मार्ग, आरे कॉलनी रोड, एस. व्ही. रोड, महात्मा गांधी रोड (कांदिवली), जे. पी. रोड, पंच मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग(बोरिवली)

मुंबईमधील महत्वाची विसर्जन ठिकाणे

गिरगाव चौपाटी

शिवाजी पार्क, दादर

जुहू बीच, सांताक्रुझ

वर्सोवा बीच, अंधेरी

भुजाळे तलाव, मालाड पश्चिम

अक्सा बीच, मालाड पश्चिम

गोराई बीच, बोरिवली पश्चिम

शीतल तलाव, कुर्ला पश्चिम

पवई तलाव, पवार वाडी

या विसर्जनादरम्यान कुठल्याही अफवांवर मुंबईकरांनी विश्‍वास ठेवू नये, शांतता राखावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.