Gangster Lawrence Bishnoi (PC - Twitter)

Gangster Lawrence Bishnoi: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली होती. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शूटरचाही या टोळीशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असतानाही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मिळवण्यात मुंबई गुन्हे शाखेला सातत्याने अडचणी येत आहेत. याचे मुख्य कारण गृहमंत्रालयाचा आदेश आहे, ज्यात बिश्नोई याची साबरमती कारागृहातून बदली करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश आधी ऑगस्ट 2024 पर्यंत लागू होता, परंतु आता तो वाढवण्यात आला आहे. बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे, तर त्याचे नाव अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये आले आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येची जबाबदारीही त्याने घेतली होती आणि सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारातही त्याचा सहभाग उघड झाला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी अनेकवेळा कोठडीची मागणी केली, मात्र यश आले नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसंदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपण बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांना सांगितले. याशिवाय सोशल मीडियावर एक पोस्टही आली आहे, ज्यामध्ये हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. सलमान खानशी जवळीक असल्याने सिद्दीकी यांना लक्ष्य करण्यात आल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सलमानने बिश्नोई समाजात पूज्य असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्यापासून बिश्नोई टोळी त्याच्यावर लक्ष ठेवून होती. जो कोणी सलमान किंवा दाऊद टोळीला मदत करेल त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही या पोस्टमध्ये देण्यात आला आहे. माहितीनुसार, अंमली पदार्थांच्या सीमापार तस्करीशी संबंधित एका प्रकरणात बिश्नोईला ऑगस्ट 2023 मध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगातून साबरमती तुरुंगात हलवण्यात आले होते. बिश्नोई यांच्यावर अनेक  खटले आहेत.

बिश्नोई तुरुंगात असताना, त्याची टोळी तीन वॉन्टेड गुंड, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि परदेशात असलेले रोहित गोदरा चालवत आहेत. १९९० च्या दशकात दाऊद इब्राहिमने ज्याप्रमाणे आपले नेटवर्क वाढवले, त्याचप्रमाणे हे दहशतवादी सिंडिकेट झपाट्याने विस्तारत असल्याचे एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे.