Shiv Sena: बुलढाण्यानंतर सांगली येथेही शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात संघर्ष, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे टळला वाद
Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकदार होऊ लागला आहे. जागोजागी हा संघर्ष अधिक उफाळून येतो आहे. बुलढाणा (Bulldhana) येथे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात आजच संघर्ष झाला. तशीच पुनरावृत्ती सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज (Miraj) येथे पाहायला मिळाली. मिरजमध्येही शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले. गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या कमानीवरुन दोन्ही गटात तणाव निर्माण झाला. प्रकरण हातघाईवर आले. मात्र, सांगली पोलिसांनी (Sangli Police) प्रसंगावधान दाखवत वेळीच हस्तक्षेप केला. ज्यामुळे वाद टळला.

मिरज येथे गणेशोत्सवासाठी स्वागत कमान उभारण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून दोन्ही बाजूंनी अर्ज आले होते. दोन्ही बाजूंनी एकाच जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता. दरम्यान, दोन्ही बाजूंनी हा संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे होती. (हेही वाचा, Buldhana Shiv Sena: बुलढाणा येथे शिवसेना, शिंदे गटात तुफान राडा, खुर्चांची फेकाफेकी आणि पोलिसांसमोरच एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणामारी)

मिरज शहराला मोठी परंपरा आहे. मिरज शहरात गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गणेशविसर्जनाने या उत्सवाची सांगता होते. गणेशविसर्जना दिवशी शहरात विविध ठिकाणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना स्वागत कमानी उभारतात. शिवसेनेचाही यात समावेश असतो. मात्र, यंदा शिवसेनेत पडलेली फूट पाहता एकाच जागेसाठी दोन दोन अर्ज दाखल झाले. त्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. एकाच जागेवर दोन्ही बाजूंनी दावा सांगितल्याने पोलिसांनी दोन्ही गटांनाही परवानगी नाकारली. मात्र, संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे दिसल्याने उत्सव आणि कायदा याचा संगम साधत पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यावहारिकता दाखवून यावर सामोपचाराने तोडगा काढला.

पोलिसांनी दोन्ही गटासोबत स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गटांनी परस्परांमध्ये चर्चा केली त्यातून त्यांनी स्वागत कमान आणि स्टेजसाठी पर्यायी जागांचा विचार सामोपचाराने केला. दोन्ही बाजूंकडून कमानीवरुन सुरु झालेला वाद सध्यातरी मिटला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.