Shiv Sena | (Photo Credit - You Tube)

शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट (Eknath Shinde Group) यांच्यातील मुद्द्यांवरची लढाई आता थेट गुद्द्यांवर आली आहे. याची पहिली प्रचिती बुलढाणा (Buldhana) येथे पाहायला मिळाली. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाला आज जहाल वळण लागले. त्यातून एका कार्यक्रमात दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला. शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या तर काहींनी एकमेकांच्या अंगावर धावून जात थेट लाथाबुक्क्यांनी परस्परांना मारहाण केली. बुलढाणा बाजार समिती परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका सत्कार कार्यक्रमात हा प्रकार घडला.

बुलढाणा बाजार समिती परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तात शिवसेनेचा सत्कार कार्यक्रम सुरु होता. या वेळी शिंदे गट समर्थक असलेल्या काही कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात धुडगूस घातला. या वेळी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती स्थानिकांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिली आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की यांना धक्काबुक्की झाली. (हेही वाचा, Ramdas Kadam On Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्यामुळेचं शिवसेना टिकली; रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका)

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पोलिसांसमोरच राडा झाला. दोन्ही गटातील लोकांची संख्या अधिक असल्याने सुरुवातीला पोलिसांना बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली. जवळपास 15 मिनीटे हा राडा सुरुच होता. नंतर पोलिसांनीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले. दरम्यान, शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी आरोप केला की आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुनाल गायकवाड हे हल्ला करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते. या फ्री स्टाईल हाणामारीची काही दृश्ये व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत.

ट्विट

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टीपेला चालल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतही दसरा मेळाव्यावरुन दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे होत आहे. दसऱ्याला शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास कोणाला परवाणगी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. शिंदे गट आणि शिवसेना दोन्ही बाजूंनी अर्ज आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.