File image of devotees immersing the Ganesha idol | (Photo Credits: PTI)

मुंबईमधील (Mumbai) भाविकांसाठी गणपती विसर्जन सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे मुंबईकर आता क्यूआर कोड स्कॅन करून किंवा बीएमसीने दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांच्या जवळच्या गणपती मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या बाप्पांच्या विसर्जनासाठी पायपीट कारवाई लागणार नाही.

गणपती उत्सवाच्या पाचव्या दिवशी मुंबईतील समुद्रात आणि कृत्रिम तलावात एकूण 31,365 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रविवारी उत्सवाच्या पाचव्या दिवसानंतर अद्याप कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 30,446 घरगुती मूर्ती, 27 हरतालिका आणि 892 सार्वजनिक विसर्जन करण्यात आले, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

10 दिवसांचा गणेशोत्सव 31 ऑगस्टपासून सुरू झाला असून, बीएमसीने शहरातील उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मोठी तयारी केली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (PoP) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी नागरी संस्थेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाने मुंबईतील कृत्रिम तलावांची यादी जारी केली आहे, जेणेकरून नागरिक तिथे आपल्या मुर्त्यांचे विसर्जन करू शकतील. दरवर्षी, नागरी संस्था मूर्ती विसर्जनासाठी तात्पुरते कृत्रिम तलाव बांधते. (हेही वाचा: गणेशोत्सव काळात पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे आशीर्वाद घेत असतानाच चोरट्याने चोरला मोबाईल, पहा व्हिडिओ

कोविड-19 चे निर्बंध उठवल्यानंतर हा सण यावर्षी उत्साहात साजरा केला जात आहे. म्हणूनच विशेष बाब म्हणून, नागरी संस्थेने यंदा पीओपी निर्मित गणेश मूर्ती वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे लागणार आहे.