Lord Ganesha | (Photo Credits: Pixabay)

यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अगदी तोंडावर आला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) या उत्सवाची मोठी धामधूम पहायला मिळते. अशात शहरातील 13 असुरक्षित पुलांविषयी गणेश मंडळांना जागरूक करण्याचे काम बीएमसी करत आहे. हे पूल मिरवणुकीच्या व्यस्त मार्गांवर आहेत. हे पूल धोकादायक घोषित करण्यात आले आहेत आणि लवकरच त्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. बीएमसीने नागरिकांना हे पूल ओलांडताना सावधगिरी बाळगण्याची विनंती केली आहे आणि विसर्जन मिरवणुकीसोबत जाताना भाविकांनी पोलिसांनी केलेल्या नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे.

यामध्ये करी रोड पूल, चिंचपोकळी पूल आणि भायखळ्याजवळील मांडलिक पूल हे असे काही पूल आहेत जे एकावेळी 16 टनांपेक्षा जास्त वजन वाहून नेऊ शकत नाहीत. चेंबूर, लालबाग आणि परळ येथून प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुका चिंचपोकळी पुलावरून गिरगाव चौपाटीवर जातात. गणेश गल्ली मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजूकाया गणपती, कॉटन ग्रीनचा राजा, नरे पार्क गणेश मंडळाच्या मिरवणुकाही याच मार्गावरून जातात.

गणेश मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, ‘शुक्रवारी, आम्ही उत्सवाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बैठक घेतली. मी या पुलंचा मुद्दा पोलीस आणि बीएमसी आयुक्तांसमोर मांडला होता आणि त्यांनी सांगितले की ही बाब विचाराधीन आहे व ते स्थानिक पातळीवरील गणेश मंडळांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना या पुलांवर नाचू नका किंवा रेंगाळू नका असे सांगत आहेत.’

वाहतूक विभागाचे डीसीपी राज टिळक रौशन यांनी द जर्नलला सांगितले की, ‘स्थानिक आणि झोन स्तरावर आमच्या बैठका सुरू आहेत. आम्ही नागरिकांना आणि मंडळांना जागरूक करत आहोत आणि मंडळे सहकार्य करण्यास तयार आहेत. आम्ही प्रत्येक मंडळासोबत एक पोलीस नाईक दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे, जो गणपती मिरवणुकीवेळी उपस्थित राहणार आहे. तो नोडल अधिकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातही असेल.’ (हेही वाचा: Ganeshotsav 2022: मुंबईच्या GSB Seva Mandal ने गणपती उत्सवासाठी उतरवला तब्बल 316.40 कोटी रुपयांचा विमा)

हे आहेत धोकादायक क्षेत्र-

घाटकोपर रेल्वे ओव्हरब्रिज

करी रोड पूल

चिंचपोकळी पूल

भायखळा रेल्वे ओव्हरब्रिज

मरीन लाईन्स रेल्वे ओव्हरब्रिज

सँडहर्स्ट रोड पूल

फ्रेंच पूल (ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान)

केनेडी पूल

फॉकलंड रोड पूल (ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यान)

बेलासिस पूल

महालक्ष्मी पूल

कॅरोल ब्रिज, प्रभादेवी

टिळक पूल, दादर

दरम्यान, जुलै 2018 मध्ये अंधेरी येथील जीके गोखले पुलाचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. मार्च 2019 मध्ये सीएसटीजवळील हिमालय फूट ओव्हरब्रिज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बीएमसीने शहरातील सर्व पुलांचे ऑडिट सुरू केले. बीएमसीने काही पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी सुरू केली आहे.