Ganesh Visarjan | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

महिन्याभर आधीपासूनच गणेशोत्सवाची लगबग सुरु होते. मात्र यंदा राज्यात कोरोना व्हायरसचे संकट असल्याने गणेशोत्सव साध्या स्वरुपात साजरा केला जाणार आहे. तसंच कोरोनााचा संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून गणेश विसर्जनासाठी पाच अधिक कृत्रिम तलावांची सोय करण्यात येणार आहे. ग्रँन्टरोड (Grant Road), ताडदेव (Tardeo), मलबार हिल (Malabar Hill), मुंबई सेंट्रल (Mumbai Central) आणि गिरगाव (Girgaon) येथे ही कृत्रिम तलावं उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल.

गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी 34 कृत्रिम तलाव उभारले होते. तरी देखील तलावांची कमतरता भासत असल्याने आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घराजवळच गणेश विसर्जन करता यावे यासाठी पालिकेने ठिकठिकाणी मोठ्या संख्येने कृत्रित तलाव उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समिती कडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत पालिकेकडून 'डी' विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाच ठिकाणी कृत्रित तलावांची सोय करण्यात येणार आहे. (यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव 2020 साठी महाराष्ट्र सरकारची मार्गदर्शक सुचना जाहीर)

5 अधिक कृत्रिम तलाव नेमके कोठे असतील?

# 'डी' विभाग कार्यालयाच्या हद्दीतील ऑगस्ट क्रांती मार्गावरील ऑगस्ट क्रांती मैदान.

# ताडदेव- साने गुरुजी मार्गावरील वसंतदादा पाटील उद्यान.

# मलबार हिल- डोंगरशी मार्गावरील एस. एम. जोशी क्रीडांगण.

# डॉ. दादासाहेब भडकम मार्गावरील गिल्डर लेन कर्मचारी वसाहत.

# गिरगाव- विठ्ठलभाई पटेल रोडवरील आंग्रेवाडीतील मोकळा भूखंड.

या कृत्रिम तलावांमुळे गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी आटोक्यात आणणे शक्य होईल. दरम्यान यंदा कोविड-19 च्या संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणपतीची मुर्ती 4 फूट आणि घरगुती गणेशाची मुर्ती 2 फुटापर्यंत असावी, असा नियम लागू करण्यात आला आहे. तसंच मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरांचे आयोजन करावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट किंवा फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यावी. अशा विविध सूचना राज्य सरकारकडून लागू करण्यात आल्या आहेत.