Seat Belt Compulsory in Mumbai: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 1 नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनांच्या चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट (Seat Belt) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. सीट बेल्ट न लावल्यास कारवाई केली जाणार आहे. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा -
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, 1 नोव्हेंबरपासून महानगरात चारचाकी चालक आणि सहप्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक असेल. एका निवेदनात शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने सर्व वाहनचालक आणि वाहनधारकांना 1 नोव्हेंबरपूर्वी चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट बांधण्याचे निर्देश दिले आहेत आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (हेही वाचा - Weather Forecast in Maharashtra: पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगलीसह 'या' शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता)
दरम्यान, 1 नोव्हेंबरनंतर मुंबईच्या रस्त्यावर चारचाकी वाहनांतून प्रवास करणाऱ्या सर्व मोटार वाहन चालकांना आणि प्रवाशांना सीट बेल्ट लावणे अनिवार्य असणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मोटार वाहन (सुधारणा) कायद्याच्या कलम 194 (ब) (1) अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. कायद्यातील तरतुदीनुसार, जो कोणी सुरक्षा बेल्ट न लावता मोटार वाहन चालवेल किंवा सीट बेल्ट न लावता प्रवाशांना घेऊन जाईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
तथापी, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा गेल्या महिन्यात पालघर जिल्ह्याजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. मर्सिडीज कारच्या मागील सीटवर बसलेल्या व्यावसायिकाने सेफ्टी बेल्ट घातला नसल्याचे अपघाताच्या तपासात समोर आले आहे. भरधाव कार सूर्या नदीवरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने या अपघातात मिस्त्री यांचा मृत्यू झाला होता.