आतापर्यंत आपण दोन स्तरीय वाहतूक व्यवस्था म्हणजेच, वाहनांच्या पुलावर रेल्वे किंवा मेट्रो मार्ग, पाहिली असेल. परंतु आता भारतामधील पहिली चार-स्तरीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Four-Level Public Transportation System) महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे. राज्याची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या नागपूर (Nagpur) येथे चार-स्तरीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक अभियांत्रिकी चमत्कार पाहायला मिळत आहे. देशातील अशा प्रकारचा पहिला चार-स्तरीय डेक नागपूरच्या कॅम्पटी रोडवर बनला आहे.
या ठिकाणी विद्यमान वाहने आणि पादचारी अंडरपास सर्वात खालच्या पातळीवर आहे. पादचारी अंडरपासच्या वर रेल्वे ट्रॅक आहेत, जो दुसरा स्तर आहे. त्यानंतर, एक राष्ट्रीय महामार्ग या रेल्वेमार्गाच्या वरून जातो, जो तिसरा स्तर आहे. तर त्यावरून मेट्रो मार्ग जात आहे, जो चौथा स्तर आहे. या बहुस्तरीय वाहतूक व्यवस्थेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे. (हेही वाचा: देशातील सहावी Vande Bharat Train बिलासपूर ते नागपूर दरम्यान धावणार, PM Narendra Modi 11 डिसेंबर रोजी करणार उद्घाटन)
अशी असेल वाहतूक व्यवस्था-
पहिला स्तर- वाहने, पादचारी अंडरपास
दुसरा स्तर- रेल्वे लाईन
तिसरा स्तर- राष्ट्रीय महामार्ग
चौथा स्तर- मेट्रो लाइन
उद्घाटनप्रसंगी कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (लाइन-1) आणि झाशी राणी स्क्वेअर ते प्रजापती नगर (लाइन-2) या मेट्रो मार्ग रविवारी नागपूरकरांना समर्पित करण्यात येणार आहेत. चार-स्तरीय वाहतूक कॉरिडॉरच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, 18.9 मीटर-रुंद स्टील गर्डर जमिनीपासून 28 मीटर उंचीवर थेट रेल्वे रुळांवर बसवला गेला आहे. हा रेल्वे मार्ग वर्धा रोडवरील 3.14 किमी पसरलेल्या आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट चा भाग आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, हा कोणत्याही मेट्रो रेल्वे प्रणालीवरील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट आहे. Afcons इन्फ्रास्ट्रक्चरने अवघ्या दोन महिन्यांत डबल डेकर स्टील स्पॅन उभारला. 18.9 मीटर रुंद गर्डरचे लाँचिंग ही भारतीय रेल्वेसाठी बहुधा पहिलीच घटना होती. 8,000 संरचनात्मक घटकांसह 1,650 मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टीलसह तयार केलेला डबल-डेकर ओपन वेब गर्डर, गेल्या हिवाळ्यात व्यस्त गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर ठेवण्यात आला होता. हा मार्ग वर्दळीचा आहे हे पाहता सर्व कामे रेल्वे ब्लॉकच्या वेळेत करण्यात आली.