शेतकरी कामगार पक्षाला (Peasants and Workers Party of India) मोठा धक्का बसला आहे. शेकापचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. महाविकासआघाडी सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार सत्तेत आल्यापासून विविध पक्षाचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. काही प्रमाणात त्याला यशही येताना दिसत आहे.
रायगड हा शेकापचा बालेकील्ला म्हणून ओळखला जातो. हाच शेकाप महाविकासआघाडीचा घटक पक्ष आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळवून भाजपने आगोदरच धक्का दिला आहे. आता विरोधात असलेल्या महाविकासआघाडीलाही खिळखिळे करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहेत. माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या रुपात भाजपने शेकाप आणि महाविकासघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या धक्क्याची पहिली पायरी विधानपरिषद निवडणुकीत पाहायला मिळाली. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा दारूण पराभव केला होता. या धक्क्यातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेला शेकापला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण, सत्तासंघर्षावर निर्णय कधी? सरन्यायाधीशांनी दिले महत्त्वाचे संकेत; घ्या जाणून)
माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पक्षप्रवेशावळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धैर्यशील पाटील हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. तळागाळातील जनतेसाठी काम करण्याचा संस्कार त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला आहे. राजकीय पक्ष बदलला म्हणून विचार बदलतो असे नाही. धैर्यशील पाटील यांनी भाजप प्रवेश केला तरी आगोदरच्याच विचाराने काम करावे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जे लोक बाहेरुन भाजपमध्ये आले आहेत. त्यांना कधीही अंतर दिले जाणार नाही. भारपमध्ये त्यांचा नेहमीच सन्मान केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.