चारा छावणी - प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit Youtube)

राफेल घोटाळ्याबाबत अजून सुनावणी चालू असताना, देशात कोणत्या बाबतीत नवीन घोटाळा होईल काही सांगता येत नाही. राज्यात दुष्काळाचे सावट असताना सरकारने चारा छावणीला (Fodder Camp) प्रोत्साहन दिले आहे. मात्र जिल्ह्यात यामध्येही घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस जनावरे दाखवून सरकारी अनुदान लाटण्याचा प्रकार बीड (Beed) जिल्ह्यात चालू होता. 36 छावण्यांची अचानक तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला, त्यामुळे आता या छावण्याच बंद करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांच्या या छावण्या असल्याचे उघड झाले आहे.

राज्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 600 चारा छावण्या आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी काल या छावण्यांची अचानक तपासणी केली, यावेळी  कुंडलिक खांडे यांची छावणी तपासताना अडथळा निर्माण केला गेला. तपासणी होऊ नये म्हणून विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला. जेव्हा पोलीस बंदोबस्तात तपासणी पार पडली तेव्हा, 800 जनावरे कमी दिसून आली. अशाप्रकारे चारा छावण्यांमध्ये बोगस जनावरे दाखवून भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. (हेही वाचा: ‘चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा’, पालकमंत्र्यांचा संतापजनक सल्ला)

जिल्ह्यात 931 छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी 600 छावण्या सुरू आहेत. बीड तालुक्यात सर्वाधिक जनावरे आणि छावण्या आहेत. मात्र पशुगणनेपेक्षा तब्बल 12 हजार जास्त जनावरे या छावण्यांमध्ये असल्याची नोंद झाली आहे. कारवाईच्या भीतीने याची संख्या कमी जास्त होत राहते, मात्र आता हा प्रकार उघडकीस आल्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.