राम शिंदे (Photo credit : Youtube)

आख्खा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना, सरकारने मात्र हात वर केले आहेत असे आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारकडून घडले आहे. शेतकऱ्यांना ‘चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा’, असा सल्ला जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला आहे. या वक्त्यव्यमुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत असून, सरकारची ही भाषा म्हणजे त्यांचे कर्तव्य झटकण्याची भाषा असल्याचे म्हटले जात आहे.

सरकारने सध्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्या आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्यात यावी या मागणीसंदर्भात, केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हेही पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी आपले गाऱ्हान घेऊन शिंदे यांना भेटायला आला. शेतकऱ्याने दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही असे सांगितल्यानंतर, ‘चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा’ असा सल्ला चक्क पालकमंत्र्यांनी दिला आहे.