Konkan Rain: कोल्हापूर, सांगलीला सरकारने दिला मदतीचा हात, तर कोकणातील पूरस्थितीकडे सरकारने फिरविली पाठ, कोकणवासियांमध्ये नाराजीचा सूर
Ratnagiri Rain (Photo Credits: Twitter)

कोल्हापूर, सांगली गेल्या काही दिवसांपासून जी पूरस्थिती पाहायला मिळत आहे, तशीच परिस्थिती कोकणातील ब-याचशा भागात उद्भवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, राजापूर, साखरपा, संगमेश्वर या भागातील बाजारपेठा अक्षरश: पाण्याखाली गेल्या असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सरकारने कोल्हापूर, सांगलीला मदतीचा हात देता देता कोकणाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केल्याने कोकणवासियांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही पूराने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

कोकणातही गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असून येथील भातशेतीचे, घरांचे, दुकानांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचेही वृत्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि अन्य भागांत पुरामुळे तसेच धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोकणात एकही मंत्री न फिरकल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

हेही वाचा- चिपळूण शहरात पुराच्या पाण्यातून वाहत आली मगर, नागरिकांची उडाली तारांबळ; वन अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी हानी (Video)

राज्यात सर्वाधिक पाऊस हा कोकणात पडतो. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा कोकणात जास्त पाऊस पडल्याने कोकणाही पूरस्थिती निर्माण झाली. मात्र महाराष्ट्रातील इतर भागातील पूरस्थितीचा आढावा घेता घेता सरकारने मात्र कोकणाकडे पाठ फिरवली. रत्नागिरीतील राजापूर आणि राजापूरवाडी गावांना आवश्यक त्या वस्तू आणि औषधांचे वाटप सुरु करण्यात आले असून डॉक्टरांचीही टीम पाठविण्यात आली आहे.

असे असले तरीही सरकारने कोकणाला जाहीर केलेली रक्कम ही अत्यंत कमी असून त्याने येथील लोकांचे आर्थिक नुकसान भरून निघणार नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कोकणातील मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्याकारणाने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ झाली. त्याचा थेट परिणाम चिपळूण शहरावर होऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.