देशात वारंवार येणाऱ्या चक्रीवादळांमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या ‘क्यार’ चक्रीवादळामुळे (kyarr cyclone) मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. क्यार चक्रीवादळाचा प्रभाव जास्त असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील काही मासेमारी नौकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तसेच खराब हवामानामुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येत नाही. गेल्या 90 दिवसांपासून राज्यातील मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टयामुळे तयार झालेल्या क्यार चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. राज्यातील क्यार चक्रीवादळाचा धोका टळला नाही तर लगेचच ‘महा’ चक्रीवादळाचे सावट मच्छीमारांच्या डोक्यावर घोगांवत आहे ‘महा’ वादळामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी परतल्या आहेत.
सरकारने राज्यातील मच्छीमारांची नुकसानीची पाहणी करावी. तसेच त्यांना राज्य सरकारने 100 कोटी रुपये आणि केंद्र सरकारने 100 कोटी रुपये आर्थिक नुकसानभरपाई द्यावी. मच्छीमारांना शून्य व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच मच्छीमारांना थकीत डिझेल परतावा तत्काळ मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा - मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये पूर; चक्क प्लास्टिक ड्रमच्या बोटीतून नवरा नवरीची पाठवणी (Video)
कयार चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी झाला आहे. परंतु ‘महा’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने पुन्हा पावसाची स्थिती तयार झाली. सध्या हे चक्रीवादळ लक्षद्वीप आणि त्यालगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. त्याच्या बाह्य़ परिघाचा विस्तार कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांपर्यंत आहे. सध्या त्याचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे पुढील दोन दिवस दक्षिण आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या जोरदार लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.