जळगाव महापालिकेचे (Jalgaon Municipal Corporation) उपमहापौर कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil) यांच्यावर गोळीबार झाला आहे. क्रिकेटच्या वादात मध्यस्थी करुन भांडण मिटवल्याच्या रागातून हा गोळीबार (Firing) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा नेम चुकल्याने पाटील थोडक्यात बचावले. पाटील यांच्या राहत्या घराजवळ ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून कुलभूषण पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात कुलभूषण पाटील थोडक्यात बचावले. पाटील यांच्या घराजवळच ही घटना घडली. त्यामुळे आपल्यावर हल्ला होतो आहे की बाब लक्षात येताच पाटील यांनी तत्काळ घरात प्रवेश करत सुरक्षीतता मिळवली. त्यामुळे या हल्ल्यात त्यांचा थोडक्यात बचाव होऊ शकला. दरम्यान, या घनेमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले.
घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जळगाव शहरात रविवारी दुपारी तरुणांमध्ये क्रिकेटचा सामना सुरु होता. या वेळी काही कारणावरुन दोन गटांमध्ये वादावादी झाली. या वादावादीचे प्रर्यावसन मोठ्या भांडणात झाले. दरम्यान, उपमहापौर कुलदीप पाटील यांनी या वादात मध्यस्थी करत हे भांडण मिटवले. त्यानंतर काही काळ हा वाद मिटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून काही हल्लेखोरानी पाटील यांच्यावर गोळीबार केला.
कुलभूषण पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी या प्रकाराबाबत बोलताना सांगितले की, क्रिकेटच्या मैदानावरील दोन गटांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला होता. दरम्यान, या भांडणात आपण मध्यस्थी केली. या मध्यस्तीमुळे परस्परांविरोधात तक्रार दाखल करणे थांबले आणि दोन्ही गट परत निघून गेले. मात्र, यातील एका गटाने मला त्यावेळी शिवीगाळ केली होती. तसेच, जीवे मारण्याचीही धमकी दिली होती, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.