Mumbai Taxi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Fare Hike For Taxis & Rickshaws: मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (MMRTA) गुरुवारी झालेल्या बैठकीत मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा (Taxis & Rickshaws) या दोन्हींच्या किमान भाड्यात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. लवकरच  या भाडेवाढीबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की, गुरुवारी बैठक झाली आणि टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडे सुधारणेवर चर्चा झाली. टॅक्सी आणि रिक्षांचे किमान भाडे 3  रुपयांनी वाढणार आहे. पूर्वी, टॅक्सी संघटनांनी काळी-पिवळी टॅक्सींसाठी किमान भाडे 4 रुपये वाढवून ते 28 वरून 32 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तर रिक्षा संघटनांनी भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये करण्याची मागणी केली होती. त्यावर निर्णय घेत हे भाडे 3 रुपयांनी वाढवण्यात आले आहे.

सूत्रांनी सांगितले की, सर्व संघटनांना याबाबत अधिसूचना जारी केली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडे 3 रुपयांनी वाढणार आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सुधारित भाडे लागू करण्यासाठी मुंबईतील सर्व वाहनांच्या मीटरचे रिकॅलिब्रेट करणे आवश्यक आहे, ही एक लांबलचक प्रक्रिया आहे, जी लवकरच पूर्ण होईल.

एमएमआरटीएने यापूर्वी 2022 मध्ये भाडेवाढ मंजूर केली होती, त्यावेळी टॅक्सींचे किमान भाडे 28 रुपये आणि ऑटो-रिक्षासाठी 23 रुपये केले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रवासी वाहतुकीची भाडेवाढ करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी यावर कोणताही निर्णय झाला नाही. गेल्या तीन वर्षांपासून भाडेवाढ करण्याची मागणी सुरू आहे. या मागणीवर आता निर्णय झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारा चालविण्यात येणाऱ्या एसटी बसच्या तिकीट दरातही 14.97% इतकी वाढ करण्यात अली आहे. (हेही वाचा: ST Bus Fare Hike: एसटी तिकीट दरात 14.95% भाडेवाढ; महाराष्ट्रात रस्ते प्रवास महागला)

राज्य परिवहन विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्य परिवहन वाहनांचे वाढीव भाडे आजपासून (24 जानेवारी) लागू होणार आहे, तर टॅक्सी आणि रिक्षा भाड्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने 30 महिन्यांनंतर बैठक घेतली, ज्यामध्ये प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. हि भाडेवाढ करून एसटीचे दररोज होणारे 2 ते 3 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढले जाईल, असा दावा करण्यात आला होता. पीटीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की, एमएसआरटीसी बसचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे आणि दररोज 55 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. एमएसआरटीसीच्या ताफ्यात 15 हजार बस आहेत, जी भारतातील सर्वात मोठी बस आहे.