ST Bus Fare Hike: 'महाराष्ट्र आता थांबणार नाही', अशी पंचलाईन घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सामान्य नागरिकांना दणका दिला आहे. राज्यातील रस्ते वाहतूक दरात बदल करण्यात आले असून, त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्याच्या परीवहन विभागने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारा चालविण्यात येणाऱ्या बस वाहतूक तिकीट दरात (ST Bus Ticket Prices) तब्बल 14.15% इतकी वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ इतक्यापुरतीच मर्यादित नाही. तर, मंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी दरातही भाडेवाड करण्यात आली आहे. संभाव्य भाडेवाड तीन रुपयांची असणार आहे.
महागाई, वाढते इंधन दर यांमुळे भाडेवाढ अटळ
परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी तिकीट वाढीस मान्यता देण्यात आली. ही वाढ येत्या तीन फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असल्याचे समजते. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यांमुळे एसटीवर जवळपास 3 कोटी रुपयांचा बोजा पडत असतो. अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षीत असते असेही त्यांनी एबीपी माझा नावाच्या वृत्तवाहिणीशी बोलताना सांगितले.
महामंडळाकडून युक्तीवाद
दरम्यान, एसटी भाडेवाड विधानसभा निवडणुकीपूर्वीच अपेक्षी होती. साधारण 2021 पासून एसटी प्रवासी वाहतूक तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असल्याने ही भाडेवाड 18% इतकी अपेक्षीत होती. मात्र, त्यामध्ये काहीशी सुधारणा करत 14.95 रुपये इतकी भाडेवाड करण्यात आल्याचा युक्तीवाद महामंडळाकडून करण्यात येत आहे.
रिक्षा, टॅक्सी प्रवासही महागला
केवळ एसटीच नव्हे तर त्यापाठोपाठ आता रिक्षा आणि टॅक्सी प्रवासही महागला आहे. ज्यामध्ये किमान तीन रुपयांची भाववाढ अपेक्षीत आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाचा मिठर साधारण 23 वरुन 26 रुपये तर टॅक्सी कमान 28 वरुन 31 रुपये भाडेवाड होणे अपेक्षीत आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीच्या या संभाव्य भाडेवाडीस मंजुरी मिळणार असल्याचे समजते. दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी यांचे मीटर प्रमाणीकर आणि इतर काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर ही भाडेवाड लागू होईल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, या भाडेवाडीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. सर्वच बाबींमध्ये वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांना सरकार नेमका कोणता दिलासा देते याबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. नागरिकांच्या खिशावर बोजा वाढत असताना देखील आम्ही सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्त्व करतो, असा दावा सरकार करत असते.