राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे फेक ट्विटर अकाऊंट; मनसेची मुंबई पोलीसांकडे कारावाईची मागणी
MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट (Fake Twitter Account) उघडून कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला पाठिंबादर्शक ट्विट केल्याचा प्रकार पुढे आला आहे. तसेच राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे,शर्मिला ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांच्या नावाने फेसबुक, ट्विटर, इन्स्‍टाग्राम आदी सोशलमिडियावर बनावट अकाऊंट बनवून मेसेज पसरविण्यात येत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनसेने मुंबईच्या पोलीस आयुक्‍त कार्यालयात तसेच सायबर सेलकडे तक्रार करत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या नावे उघडलेल्या अनधिकृत ट्विटर हँडलवरुन कंगना रनौत हिला पाठिंबा देताना संबंधीत युजरने म्हटले आहे की, येत्या 9 तारखेला हिंदू वाघीण कंगना रनौत हिचे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे भव्य स्वागत करण्यात येईल. हिंमत असेल तर आढवून दाखवा. असे म्हणत #कंगना_रनौत आणि #संजय_राऊत असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. (हेही वाचा, Fact Check: राज ठाकरे यांनी दिला कंगना रानावत हिला पाठिंबा? ट्विटर पोस्टमधील दाव्यात किती तथ्य)

दरम्यान, कंगना रनौत हिच्यावर टीकेची चौफेर झोड उठली आहे. राज्यातील जवळपास सर्वपक्षीय नेत्यांनी कंगनाच्या विधानावर टीका केली आहे. तसेच अनेकांनी कंगना हिने माफी मागावी असेही म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला कंगना रनौत हिला पाठिंबा देणारेही पुढे येत आहे. यात राजकीय पक्षाचे नतेही आहेत.