Mumbai Local Trains: केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांसह 'या' कर्मचाऱ्यांनाही 1 जुलैपासून मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार!
Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली होती. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) नुकतेच एक ट्वीट केले आहे. ज्यात 1 जुलैपासून मुंबई उपनगरीय लोकलमधून केंद्रीय, राज्य सरकारचे कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी, राज भवनातील कर्मचाऱ्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनीही लोकलने प्रवास करता येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकूण 200 लोकल फेऱ्या होतात. त्यात आणखी 150 फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून मध्य रेल्वेवर 350 लोकल धावणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरही 202 लोकल फेऱ्या होत असून यामध्ये बुधवारपासून 148 फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही उद्यापासून 350 लोकल धावणार आहेत. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करु शकतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हे देखील वाचा- लॉकडाऊनमध्ये विनाकारण प्रवास करणाऱ्या नागरिकांवर मुंबई पोलिसांची कारवाई; दिवसभरात तब्बल 16 हजार वाहने जप्त

पीयूष गोयल याचे ट्वीट-

राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱी लोकमधून प्रवास करू शकतात. महत्वाचे म्हणजे, अद्यापही सर्वसामन्यांना लोकमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मंत्रालय, पोलीस कर्मचारी, मुंबई महानगर पालिका कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, यांनाच लोकमधून प्रवास करण्याची मुभा होती. मात्र, उद्यापासून राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, राज भवनातील कर्मचाऱ्यांनाही आता लोकमधून प्रवास करता येणार आहे.