प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे (Indian Railway) अनेक सुविधा पुरवते मात्र कधी कधी याच सोयी जीवघेण्याही ठरू शकतात. अशीच एक घटना ठाणे (Thane) स्थानकामध्ये घडली आहे. इथे लिफ्ट बंद पडल्याने तब्बल 90 मिनिटांपेक्षा जास्त काळ एक जेष्ठ नागरिक आतच अडकून पडले होते. आनंद चैके असे या व्यक्तीचे नाव असून, ते कळवा टाउनशिपचे रहिवासी आहेत. लिफ्टमध्ये अचानक बिघाड झाल्याने 65 वर्षीय आनंद लिफ्टमध्येच अडकून पडले होते. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या प्रयत्नाने ही लिफ्ट उघडली व आनंद यांना बाहेर काढण्यात आले.
ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिलेल्या महितीनुसार ही घटना सोमवारी, सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आनंद हे ठाण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी निघाले होते. फलाट क्रमांत 5 वर येणारी जलद लोक पकडण्यासाठी त्यांनी लिफ्टचा वापर केला. त्याचवेळी बिघाड झाल्याने लिफ्ट मध्येच बंद पडली. त्यानंतर प्रशासनाने ती वर खाली करायचा तसेच ती सुरु करायचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाची मदत घेण्याचे ठरले.
मात्र त्यांनाही लिफ्ट सुरु करता आली नाही. शेवटी दीड तासानंतर लिफ्ट थोडी वर आल्यावर आनंद यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. लिफ्टमधून घाबरलेल्या अवस्थेतील आनंद यांना बाहेर काढतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेमुळे आनंद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात असून, स्थानकातील लिफ्टवर देखील शंका घेतली जात आहे.