Lift

वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या मात्र, लिफ्टमध्येच अडकून पडलेल्या 59 वर्षीय व्यक्तीची तब्बल दोन दिवसांनी सुटका करण्यात आली आहे. केरळ राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली. रवींद्रन नायर असे या व्यक्तीचे नाव आहे. ते उल्लूर येथील रहिवासी आहेत. ते बाह्यरुग्ण (ओपी) ब्लॉकच्या लिफ्टमध्ये शनिवारी (13 जुलै) अडकले होते. अखेर त्यांची सोमवारी (15 जुलै) रोजी सुटका करण्यात आली.

घटना कशी घडली

रवींद्रन नायर यांनी पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये प्रवेश केला होता. परंतु लिफ्ट त्याऐवजी खाली उतरली आणि दरवाजे उघडले नाहीत. मदतीसाठी आरडाओरडा करूनही कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. त्यातच त्यांचा फोन बंद झाल्याने त्यांना मदतीसाठी फोनही करता आला नाही. त्यामुळे ते मदत आणि अन्न-पाण्याविण तसेच लिफ्टमध्ये अडकून राहिले. (हेही वाचा, Delhi: दिल्लीतील बवाना येथे लिफ्टमध्ये अडकल्याने तरुणाचा वेदनादायक मृत्यू; कूलरच्या कारखान्यात घडला अपघात)

शोध आणि बचाव

दुसऱ्या बाजूला नायर कुटुंबीयांकडून रविंद्रन यांचा शोध सुरु होता. दोन दिवस शोध घेऊनही ते सापडत नव्हते. दरम्यान, सोमवारी सकाळी लिफ्ट ऑपरेटरने नियमित देखभाल दुरुस्तीच्या नियमीत कामासाठी लिफ्ट सुरू केली. तेव्हा त्याला धक्काच बसला. आतमध्ये एक इसम अडकून पडल्याचे त्याच्या लक्षात आले. नायर हे लिफ्टमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ मदत पोहोचविण्यात आली आणि त्यांची सुटका करण्यात आली. बराच वेळ झाला तरी नायर घरी परतले नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी रविवारी रात्री वैद्यकीय महाविद्यालय पोलिसांकडे बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सांगितले की, नायर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. मात्र, लिफ्ट बंद पडल्याने ते लिफ्टमध्येच अडकले. त्यांनी मदतीसाठी कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे ओरडणे ऐकू आले नाही आणि त्यांचा फोन बंद होता. नायरची सुटका केल्यानंतर आता सुखरूप असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, केवळ केरळच नव्हे तर देशभरातही लिफ्टबाबत अनेक दुर्घटना घडत असतात. कधी लिफ्ट अचानक कोसळते, कधी लिफ्टमध्ये नागरिक अडकले जातात तर कधी लिफ्टमध्ये अचानक झालेल्या बिघाडामुळे त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना दुखापत होते. महाराष्ट्र आणि खास करुन मुंबई शहरातही अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी घडल्याचे पुढे आले आहे. लिफ्ट मध्येच अडकणे, कोसळणे यांसारख्या प्रश्नांवरुन राज्याच्या विधिमंडळातही अनेकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. अलिकडेच अशा एका प्रकारावरुन राज्याच्या विधिमंडळामध्ये चर्चा झाली आणि विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी चौकशीचे आदेशही दिले.