महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अगदी काहीच दिवस उरले आहेत. आणि म्हणूनच राज्यभरातील रावच पक्षाचे उमेदवार आपल्या प्रचाराचं शक्तिप्रदर्शन दाखवण्यात सध्या व्यस्त आहे. काही पक्षांनी तर मोठमोठ्या नेत्यांना बोलवून प्रचार सभा देखील घ्यायला सुरुवात केली आहे. सामान्य नागरिकांपर्यंत आपला आवाज पोहोचावा व प्रचारात कोणती कसर राहू नये म्हणून हे राजकीय उमेदवार विविध माध्यमांचा वापर करताना दिसून येतील.
सध्या सोशल मीडियावरून प्रचार करणं यावर देखील जोर दिला जात आहे. त्यासाठी व्हाट्सअँप ग्रुप्स, फेसबुक पेजेस, ट्विटर आणि इंस्टाग्राम पोस्ट्स या विविध सोशल मीडिया माध्यमांचा वापर केला जातो. परंतु या सोशल मीडिया प्रचारामुळे काही वादग्रस्त घडू नये म्हणून निवडणूक आयोगाने या माध्यमांकडे देखील नजर ठेवायचं ठरवलं आहे. आणि या कामासाठी निवडणूक आयोगाने गृह विभागाच्या सायबर सेलची मदत घेतली आहे. त्यासाठी मंत्रालयात चार वॉररुम देखील बनवण्यात आल्या आहेत.
कोणावर होणार कारवाई?
सोशल मीडियाद्वारे जातीय तसेच धार्मिक वाद निर्माण करणारे, मॉबलिंचिंग किंवा दंगल यासारख्या प्रकारांना चिथावणी देणारे या सर्वांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.
आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर अशी ठेवली जाणार नजर
मंत्रालयात राज्य माहिती व जनसंपर्क विभागाकडून चार वॉररुम तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या वॉररुममध्ये 20 LED TV लावण्यात आले आहेत. त्या माध्यमातून सर्व न्यूज चॅनेल्सवरील बातम्यांकडे लक्ष ठेवले जाणार आहे.
दुसऱ्या वॉररुममध्ये सर्व वृत्तपत्रांमधील बातम्यांमधला प्रत्येक शब्द तपासून जाहिराती व पेडन्यूजची पडताळणी करण्यात येणार आहे.
तिसऱ्या वॉररुममध्ये सायबर नियंत्रण व ट्रोलिंग कक्षाच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही पोस्टमुळे आचारसंहितेचा भाग झाल्यास, तो कन्टेन्ट ताबडतोब तिथून काढण्यात येणार आहे व नंतर संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे.