अबब! भाजपकडे पैसाच पैसा.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खर्च केली विरोधकांपेक्षा चौपट रक्कम: ADR अहवाल
BJP | (Photo credit: Archived, edited, representative images)

Association for Democratic Reforms Reports 2019: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) रणधुमाळी सुरु असून, प्रत्यक्ष मतदानास काहीच दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत. निवडणूक प्रचारात मतदारांपर्यंत पोहोचण्यात कोणतीही कसर राहू नये यासाठी हे पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हे सर्व राजकीय पक्ष तूफान पैसा खर्च करताना दिसत आहे. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष खर्च करत असले तरी, या सर्वात भारतीय जनता पक्ष अव्वल असल्याचे पुढे आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (Association for Democratic Reforms)या संस्थेने नुकताच आपला एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या तूलनेत तब्बल चौपट रक्कम खर्च केली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) संस्थेने हा अहाल प्रसिद्ध केला असाल तरी हा अहवाल, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये करण्यात आलेल्या खर्चासंबंधी नाही. तर, सन 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांतील खर्चाबाबतचा आहे. या अहवालातच भाजपने इतर सर्व विरोधी पक्षांच्या निवडणूक खर्चाच्या चौपट रक्कम खर्च केल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, भाजपमध्ये बंडखोरी, दहा दिवसांत 100 नेत्यांची हकालपट्टी; शिस्तभंगाच्या आरोपाखाली नेतृत्वाकडून कारवाई)

एडीआरच्या अहवालानुसार, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी मिळून 2014 मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये तब्बल 280 कोटी रुपये निवडणूक प्रचारावर खर्च केले होते. या अहवालात निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांना एकूण किती निधी मिळाला. त्यातला किती निधी पक्षांनी निवडणुकीवर खर्च केला याबबतचा तपशीलही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुक कालावधीत तब्बल 464.55 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे इतकी मोठी रक्कम केवळ 15 पक्षांनाच मिळाली होती. या रकमेपैकी सर्व राजकीय पक्षांची मिळून 357.21 कोटी रुपये रक्कम खर्च झाली. राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चाचा तपशील आणि आकडेवारीसह एडीआर अहवाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आकडेवारीतच सांगायचे तर, भारतीय जनता पक्षाला 296.74 कोटी रुपये, काँग्रेस पक्षाला 84.37 कोटी रुपये निधी मिळाला. 2014 मध्ये भाजपने 217.68 कोटी रुपये, तर काँग्रेस ने 55.27 कोटी रुपये खर्च केले. शिवसेना पक्ष 17.94 कोटी रुपये तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 कोटी रुपये निवडणुकीत खर्च केले. आता 2019 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक सुरु आहे. विधानसभा निवडणूक 2019 साठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळतो आणि त्यातला हे पक्ष किती खर्च करतात याबाबत उत्सुकता आहे. तसेच, जनता कोणाच्या पारड्यात वजन टाकते यााबाबतही उत्सुकता आहे.