Eknath Khadse On ED Notice: नोटीस मिळाली, 30 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहणार- एकनाथ खडसे
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) विभागाकडून आलेली नोटीस भोसरी भूखंड प्रकरणाशी (Bhosari MIDC Case) संबंधित आहे. या प्रकरणात आपण ईडीला सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहोत. त्यासाठी प्राप्त नोटीशीनुसार येत्या 30 डिसेंबरला ईडी (ED) कार्यालयात स्वत: किंवा आपला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी सांगितले की, त्यांना प्राप्त झालेली ईडीची नोटीस ही भोसरी येथील भूखंड प्रकरणातील आहे. या प्रकरणाची चौकशी या आधी चार वेळा झाली आहे. आता ही पाचवी चौकशी आहे. हा भूखंड माझ्या नावावर नाही. तो भूखंड माझ्या पत्नीच्या नावे आहे. या भूखंडाबाबत झालेल्या चौकशी आपण सर्व कागदपत्रे दिलेली आहेत. इतकेच नव्हे तर पुणे, नाशिक अॅन्टी करप्शन, इनकम टॅक्स, झोटींग समितीने अशा चार प्रकारच्या चौकशाही या प्रकरणात झाल्या आहेत, असे खडसे यांनी सांगितले. (हेही वाचा, ED Notice To Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस)

दरम्यान, या प्रकरणात आलेली नोटीस आपल्या स्वत:च्या नावे आल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात ईडीला आपण सर्व सहकार्य करणार आहोत असेही ते म्हणाले. दरम्यान, या वेळी एकनाथ खडसे यांनी इतर विषयांवर बोलने टाळले. आज आपण केवळ ईडीची नोटीस याच विषयावर बोलणार आहोत. जर काही वेगळ्या विषयावर बोलायचे असेल तर नंतर बोलेण असेही खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर अल्पावधितच खडसे यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.