Eknath Khadse on Devendra Fadnavis: 'देवेंद्र फडणवीस यांचे विधान वेदनादायी, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मुंबई वाचली' एकनाथ खडसे भावूक
Eknath Khadse, Devendra Fadnavis | (Photo credit: Archived, Edited, Symbolic Images)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असा केल्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही फडणवीस यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब होते म्हणूनच 1993 च्या दंगलीत मुंबई वाचली हे सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मान्य नसेल. त्यांचे विधान हे वेदनादायी असल्याची भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. खरे तर देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विचार बाजूला ठेवत बाळासाहेबांचा आदर करायला हवा होता. त्यांनी बाळासाहेबांबद्दल जी विधाने केली ती केवळ त्यांच्या नैराश्येतून आली असावीत, असेही खडसे म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Anil Deshmukh Resign: अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती, शिवसेना खासदर संजय राऊत यांचे वक्तव्य)

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकासआघाडीला युतीचा प्रस्ताव दिला होता. यावरुन प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता 'आम्ही पाहतोच आहे सत्तेसाठी ते आणखी काय काय करतात. केवळ सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहेत. त्यांचे लोक आजानची स्पर्धा वैगेरे घेऊ लागले आहेत. त्याचाच हा परिणाम आहे का हे पाहूयात', अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाविकासआघाडी सरकारमधील इतर पक्षांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.