Effects of Yaas Cyclone on Maharashtra: यास चक्रीवादळ महाराष्ट्रातही परिणाम दाखवणार? काही जिल्ह्यात हलक्या ते मध्य पावसाची शक्यता; अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टीचे संकेत
Weather | Representative Image (Photo Credits: Pixabay)

तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. त्यानंतर आकाश काही काळ निरभ्र राहिले. वातावरणही कोरडे राहिले. उन्हाचा चपाटा वाढला. तोवर यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल, उडीसा राज्यांमध्ये आपला पराक्रम दाखवणार असे वृत्त आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हवामान (Maharashtra Weather) कसे राहील याबाबत शेतकरी आणि हवामानाशी संबंधीत क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना उत्सुकता होती. पुणे वेधशाळेने (Pune Meteorological Department) बुधवारी (26 मे 2021) पुढच्या चार ते पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तर कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पावसाच्या काहीशा हलक्या सरी (Rain In Maharashtra) कोसळू शकतात. जाणून घ्या मुंबईसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हवामान कसे असू शकेल. पुणे वेधशाळेचा हवामानाचा अंदाज पहण्यासाठी इथे क्लिक करा.

मुंबईमध्ये पावसाची शक्यता कमी असली तरी आकाश काही प्रमाणात ढगाळ राहू शकेल. याशिवाय कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस मेघगर्जनेसह हजेरी लावेन, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या 'यास' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही प्रमाणात (Effects of Yaas Cyclone on Maharashtra) का होईना परिणाम जाणवणार आहे, असे हवामान विभाग सांगतो. (हेही वाचा, Cyclone Yaas च्या पार्श्वभूमीवर आज CSMIA वरून Mumbai-Bhubaneswar, Kolkata मार्गावरील 6 उड्डाणं रद्द)

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे आदी विभागात मेघगर्जनेसह पावसाची अधिक प्रमाणावर शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाराही पाहायला मिळू शकेल. या वेळी वारे प्रतितास 30 ते 40 किलोमीटर प्रतीतास या वेगाने वाहू शकेल. विदर्भात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरवाती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.