
तंतूमय पदार्थ आणि खनिजांनी समृद्ध अशा ड्रॅगनफ्रूट (Dragon Fruit) फळाची महाराष्ट्रातून (Maharashtra) दुबईला (Dubai) निर्यात केली जात आहे. यामुळे अशा प्रकारच्या विदेशी फळांच्या निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे. या परदेशी वैशिष्ट्यपूर्ण फळाला कमलम असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यामधील तडसर इथल्या शेतकऱ्यांनी निर्यात होत असलेल्या ड्रॅगनफ्रूटचे उत्पादन घेतले आहे. यावर आवरणाचे तसेच प्रक्रियेचे काम अपेडा मान्यताप्राप्त निर्यातदार एम. एस. के बी यांनी केले आहे.
ड्रॅगन फळाचे शास्त्रीय नाव हायलोसेरेयुसुंडेटस असून मलेशिया, थायलंड, फिलिपाईन्स, अमेरिका आणि व्हिएतनाम या देशांमध्ये ही फळे पिकवली जातात.
भारतात 1990 च्या सुरुवातीला ड्रॅगनफ्रूटचे उत्पादन घ्यायला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षात ड्रॅगनफ्रूटची लोकप्रियता वाढली असून देशातील विविध राज्यातले शेतकरी याची लागवड करु लागले आहेत. या फळाची लागवड सध्या प्रामुख्याने कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे इथे केली जाते. याच्या लागवडीसाठी पाणी कमी लागते. तसेच विविध प्रकारच्या मातीतही ते उगवते. सफेद गर आणि गुलाबी साल, लाल गर आणि गुलाबी साल तसेच सफेद गर आणि पिवळी साल हे याचे प्रामुख्याने तीन प्रकार आढळतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2020 मधे आकाशवाणी वरील आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात गुजरातमधील रखरखीत कच्छ भागात होत असलेल्या ड्रॅगनफ्रूट च्या शेतीचा उल्लेख केला होता. भारताची उत्पादनातील आत्मनिर्भरता सुनिश्चित करण्यासाठी फळांची लागवड केल्याने कच्छच्या शेतकऱ्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले होते.