
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा भारत दौरा आज संपणार आहे. 2 दिवसांच्या दौ-यावर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अहमदाबादला भेट दिली तर आज ते दिल्लीत आहेत. त्यांच्या या दौ-याबाबत अनेक स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र त्यात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी काही वेगळंच वक्तव्य केले आहे. "डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे." असे त्यांनी आपल्या कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग उन्नती योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दिल्या जाणा-या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी "डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दौऱ्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त होतील", असा दावा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी केला. तसेच डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे असे अजब वक्तव्य देखील या कार्यक्रमात केले.
डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी या दोन दिवसाकरिता भारत दौ-यावर आले आहेत. यात त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई देखील आले आहे. ट्रम्प कुटुंबाचं काल (24 फेब्रुवारी) मोठ्या जल्लोषात अहमदाबाद विमानतळावर स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोठा रोड शो काढण्यात आला. त्यानंतर ते साबरमती आश्रमात गेले आणि नंतर सरदार वल्लभाई स्टेडियम येथे मोठी सभा झाली.
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत सुमारे 3 अब्ज डॉलरच्या डिफेंस डीलवर स्वाक्षरी झाल्याची माहिती डोनाल्ड ट्र्म्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. यावेळेस झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या प्रश्नावरून खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानामध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर लगाम लावणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळेस भारत आणि अमेरिका दरम्यान असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचादेखील उल्लेख केला आहे. सोबतच हा भारत दौरा अविस्मरणीय असल्याचंदेखील म्हटलं आहे.