हनीमूनला गेल्यावर पत्नीला 'सेकंड हँड वाईफ' (Second Hand Wife) म्हणणे पतीला महागात पडले आहे. न्यायालयाने पतीला पत्नीला 3 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय दरमहा दीड लाख रुपये देखभाल भत्ताही द्यावा लागणार आहे. ट्रायल कोर्टाच्या या निर्णयाबाबत पतीने मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (27 मार्च 2024) कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला, ज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात महिलेला 3 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.
लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टाने म्हटले की, दोघेही सुशिक्षित आहेत. अशात पत्नीला 'सेकंड हँड वाईफ' म्हणणे आणि तिच्यावर अत्यचार करणे ही बाब कौटुंबिक हिंसाचार आहे. पत्नीसाठी अशा प्रकारचे शब्द वापरल्याने तिच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, कनिष्ठ न्यायालयाने योग्य निर्णय दिला आहे, यात आम्हाला कोणतीही चूक दिसत नाही. 1994 ते 2017 पर्यंत घरगुती हिंसाचार सुरूच होता. अशा परिस्थितीत कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात काहीही चुकीचे नाही.
पती आपल्यावर हसत असल्याचा आरोप पत्नीने केला होता. हनीमूनच्या वेळी नवऱ्याने तिच्यावर अत्याचार केल्याचेही तिने सांगितले. याशिवाय अमेरिका आणि भारतात हे सर्व सुरूच होते. तसेच पतीने सतत तिच्या चारित्र्यावर शंका घेण्यास सुरुवात केल्याचा आरोपही पत्नीने केला आहे. याच मुद्द्यावर कनिष्ठ न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल दिला, ज्याला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, 1994 मध्ये तिचे लग्न झाले. त्यानंतर ते हनिमूनसाठी नेपाळला गेले होते. यावेळी पतीने तिला 'सेकंड हँड' म्हटले. पिडीत महिलेचे आधी एक होणारे लग्न तुटले होते. पुढे नवरा-बायको दोघेही अमेरिकेला गेले. मात्र हळू हळू त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघेही 2005 मध्ये मुंबईत परतले. त्यानंतर पत्नी 2008 मध्ये माहेरी राहायला गेली आणि 2014 मध्ये पती एकटाच अमेरिकेला परतला. (हेही वाचा: Suicide Due to Menstrual Cycle Pain: मासिक पाळीच्या वेदना असहाय्य, अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मुंबई येथील घटना)
पत्नीने नाराज होऊन 2017 मध्ये घटस्फोटाची केस दाखल केली. अमेरिकेच्या न्यायालयाने 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट मंजूर केला. मात्र 2017 मध्ये पत्नीने मुंबईत घरगुती हिंसाचार अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सुनावणी मध्ये पत्नी घरगुती हिंसाचाराला बळी पडल्याचे न्यायालयाने मान्य केले. जानेवारी 2023 मध्ये न्यायालयाने पतीला नुकसानभरपाई म्हणून 3 कोटी रुपये, दादरमध्ये घर किंवा दरमहा 75 हजार रुपये भाडे आणि दरमहा दीड लाख रुपये देखभाल भत्ता देण्याचे आदेश दिले.