Domestic Flights Guidelines: देशात आज पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु; महाराष्ट्र सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सुचना
Passengers Reach Mumbai Airports as Flights Resume Operations Today (Photo Credits: ANI)

अखेर आज पासून देशामध्ये देशांतर्गत विमान सेवा (Domestic Flight Travel) सुरु झाली आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईतून दिवसाला केवळ 25 विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होईल, असे सांगितले आहे. मुंबई विमानतळ हे राज्यातील रेड झोनमध्ये असल्याने या ठिकाणी विमान सेवा सुरु करण्यासाठी सरकार टाळाटाळ करत होते. अशात आता राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका, सरकारने जारी केली. त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि या प्रवाशांनी 14 दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक असणार आहे.

प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून, विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. मात्र  हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही. विमानतळ असलेल्या संबंधित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, व राज्यात या नियमांचे कडक पालन होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे.

प्रवाशांची नावे, त्यांच्या येण्याचा दिवस, वेळ, मोबाईल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधित एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

विमान प्रवासाबाबत केंद्र शासनाने काल मार्गदर्शिका जारी केली होती. जे प्रवासी राज्यात कमी कालावधीसाठी येणार आहेत (एक आठवड्यापेक्षा कमी) आणि त्यांचे पुढील प्रवासाचे किंवा परतीचे नियोजन आहे, त्यांनी याची संपूर्ण माहिती दिल्यास त्यांना गृह विलगीकरणातून सवलत देण्यात येईल. मात्र या प्रवाशांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी नसेल.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील माहिती, सेवा पुरवठा एजन्सींनी प्रवाशांना तिकीटासोबत देणे बंधनकारक आहे. सर्व प्रवाशांनी आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी या ॲपवरिल संबंधित घोषणापत्र भरावे. कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात विमानात तसेच विमानतळांवर उद्घोषणा करण्यात याव्यात. तसेच प्रवाशांकडून विमानतळावर तसेच विमानत चढ-उतार करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

विमानतळावर तपासणीसाठी पुरेसे वैद्यकीय पथक कार्यरत असेल याची काळजी नोडल अधिकारी यांनी घ्यायची आहे. विमानतळाचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असून साबण, सॅनिटायजर यांची उपलब्धता करण्यात यावी. प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची थर्मल तपासणी होईल याची काळजी विमानतळ प्राधिकरणाने घ्यायची आहे. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश देण्यात येईल. (हेही वाचा: मुंबईत आज 1430 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची व 38 मृत्यूची नोंद; शहरातील एकूण सकारात्मक प्रकरणे 31,789 वर)

सर्व प्रवासी, एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करावा. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांना नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात येईल.