Disqualification Notices: आदित्य ठाकरे वगळता उद्धव ठाकरे गटातील सर्व आमदारांना बजावल्या अपात्रतेच्या नोटिसा; व्हीपचा केला अवमान
Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्य व्हीप भरत गोगावले (एकनाथ शिंदे कॅम्पचे) यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या आहेत. गोगावले म्हणाले की त्यांनी आदित्य ठाकरेंना ‘बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा आदर’ म्हणून नोटीस पाठवली नाही. अशाप्रकारे उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. गोगावले म्हणाले, ‘आम्ही आमचा व्हीप झुगारणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.’

आज विधिमंडळात एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. या ठरावाच्या बाजूने 164 जणांनी मतदान केले, तर 99 सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. यामध्ये उद्धव ठाकरे गटातील 15 आमदारांचा समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीपचे उल्लंघन केल्याबद्दल उद्धव ठाकरे गटाला कारवाईचा इशारा दिला होता. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे, यासाठी भरत गोगावलेंनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला होता. शिंदे गटात असलेल्या 40 आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर इतरांनी विरोधात मतदान केले.

सभागृहाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य विधानसभेत महत्त्वपूर्ण फ्लोअर टेस्ट जिंकल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे म्हणाले होते, ‘उद्धव ठाकरे गट नियमितपणे कोर्टात जात आहे आणि आज ते सुप्रीम कोर्टातही गेले आहेत. भरत गोगावले हे आमचे व्हिप आहेत आणि मी स्वतः विधीमंडळ पक्षनेता आहे. आमच्या व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’ (हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल; CM Eknath Shinde यांची VAT संदर्भात मोठी घोषणा)

दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निर्णयानुसार, पक्षाच्या नवीन व्हिप ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या नव्या याचिकेवर आज 11 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.