Gadchiroli: कुरखेडा येथे सी-60 जवानांनी नष्ट केली नक्षल छावणी; गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याचा सूत्रधार दिनकर गोटा व त्याची पत्नी सुनंदा कोरेटी यांना अटक
Representational Image | (Photo Credit: PTI)

आज, बुधवारी गडचिरोलीच्या (Gadchiroli) कुरखेडा येथे महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) कमांडो-60 च्या जवानांच्या तुकडीची नक्षलवाद्यांशी चकमकी झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचा तळ उध्वस्त झाला असून, शिबिरात उपस्थित सुमारे 70-80 नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पण पोलिसांनी त्यांना जंगलात पळ काढण्यास भाग पाडले. घटनास्थळावरुन आयईडी आणि इतर सामग्री जप्त केली गेली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी, गेल्या वर्षी 1 मे रोजी गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा (Dinkar Gota) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या स्फोटात 15 पोलिसांसह एका चालकाचा मृत्यू झाला होता.

याबाबत गडचिरोलीचे एसपी शैलेश बालकवडे म्हणाले की, 'दिनकर गोटा जांभूळखेडा येथील स्फोटामागील मुख्य सूत्रधार आहे, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत पोलिसांनी त्याची पत्नी नक्षलवादी सुनंदा कोरेटी हिलाही अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी कोची दलम मंडल समितीचे सदस्य, दिनकर गोटा आणि त्याची पत्नी सुनंदा कोरेटी (Sunanda Koreti) यांना अटक केली. या स्फोटात 15 पोलिस आणि चालक ठार झाले होते. दत्तापूर-कुरखेडा येथे 36 वाहने जाळण्यात त्यांचादेखील सहभाग होता. (हेही वाचा: गडचिरोली नक्षल चळवळीचे नर्मदा आणि राजन यांना अटक; महराष्ट्रदिनी घडवला होता IED blast)

गडचिरोलीत गोटाविरूद्ध 33 खून प्रकरणांसह, किमान 108 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोटा याला पकडण्यासाठी 16 लाखांचे इनाम ठेवण्यात आले होते, तर सुनंदा हिच्यासाठी 2 लाखांचे इनाम होते. कोरेटीविरूद्ध  38 गंभीर गुन्हे आहेत. बुधवारी सकाळी जिल्हा पोलिसांनी नक्षल शिबिरही उध्वस्त केले. यात सुमारे 70  नक्षलवाद्यांना पळ काढण्यास भाग पाडले. नक्षलवादी कुरखेडा तहसीलमध्ये मोठ्या हल्ल्याची योजना आखत असल्याचा संशय होता. चकमकीनंतर छावणीतून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. 2009 नंतरचा गडचिरोली हल्ला हा नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा हल्ला होता. 2009 मध्ये, नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 51 सुरक्षा जवान शहीद झाले होते.