Dharavi Redevelopment Project: मुंबईमधील (Mumbai) धारावी (Dharavi) या झोपडपट्टी परिसराचे पुनर्वसन होऊ घातले आहे. अदानी समूह हा प्रकल्प हाताळत आहे. धारावी हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पुनर्वसन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 46 हजार 191 निवासी परिवारांचे, तर 12 हजार 974 अनिवासी असे एकूण 59 हजार 165 परिवाराचे पुनर्विकास होणार आहे. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL) द्वारे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील रहिवाशांना 350 चौरस फूट क्षेत्रफळाची घरे संलग्न किचन आणि बाथरूमसह दिली जाणार आहे.
डीआरपीपीएलच्या प्रेस नोटनुसार, पात्र निवासी सदनिका या 1 जानेवारी 2000 पूर्वी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि अंगभूत स्वतंत्र स्वच्छतागृह असेल, ज्याची रचना चांगली प्रकाशमान, हवेशीर, स्वच्छतापूर्ण आणि सुरक्षित असेल. यापूर्वी, महाराष्ट्रातील अनौपचारिक वसाहतींमधील रहिवाशांना 269 चौरस फूट घरे दिली जात होती. 2018 पासून, राज्य सरकारने 315 चौरस फूट ते 322 चौरस फूट घरे वाटप करण्यास सुरुवात केली.
डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘नवीन सदनिका हे सर्व धारावीकरांसाठी स्वप्नवत घरे असतील आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा करतील. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. धारावीला व्यावसायिक आणि औद्योगिक परिसरासह जागतिक स्तरावर जोडलेले शहर बनवण्याचा दृष्टीकोन आहे, आणि त्याची अनोखी उद्योजकता अबाधित ठेवली जाणार आहे.’
आर्थिक संधी, भविष्यकालीन शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, प्रगत आरोग्य सुविधा आणि भागधारकांसाठी दर्जेदार जीवनशैली यांचा समावेश हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये इतर सुविधांसह सामुदायिक हॉल, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक जागा, उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी डेकेअर सेंटर्स यांचा समावेश केला जाईल. (हेही वाचा: Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड)
दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, धारावी हे बिजनेस हब आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. देशाच्या व राज्याच्या आर्थिक घडामोडीत धारावीचे योगदान मोठे आहे. या गोष्टी नजरेसमोर ठेवून नियोजन करावे लागणार आहे. म्हणूनच इथे इंडस्ट्रीयल आणि बिझनेस झोन तयार करण्यात येणार आहे. या मध्ये सुविधा केंद्र तयार करुन देणार आहे. याचा धारावीतील उद्योजकांना फायदा होणार आहे. त्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर पुढील पाच वर्षासाठी कर माफी देखील करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून घेतलेल्या जीएसटीचा परतावा देखील देण्यात येणार आहे.